कोल्हापूर : आजवर देशात वक्फ कायद्याची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ कायद्यात दुरुस्ती करण्याचा घेतलेला निर्णय देशाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि क्रांतिकारक स्वरूपाचा आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यामध्ये वक्फ कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाबाबत खासदार महाडिक यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले होते. याबद्दल, सकल हिंदू समाजाच्या वतीने आज खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.
सुवासिनींकडून औक्षण करून, फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. त्या वेळी ते बोलत होते. प्रारंभी पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपक पाटील, रणजित पाटील-चुयेकर, संजय वास्कर, महेश पाटील, किरण घाटगे, राहुल पाटील, अवधूत कोळी, हातगोंड पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.