राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती
आगामी काळात आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट केली जाईल, असे सांगत खासदार धनंजय महाडिक यांनी पक्ष व मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेतल्याचे संकेत दिले.
करवीर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या महिन्यात झटका बसला होता. पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या पक्षाला उभारी आणण्यासाठी बािलगा या गावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
महाडिक म्हणाले, गेल्या चार वर्षांत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात साडेसहा हजार कोटींची कामे केली आहेत. केंद्र शासनाने पेट्रोल-डिझेल दरात प्रचंड वाढ केली असल्याने जनतेत नाराजी वाढत आहे. देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवार यावेत ही राज्यातील सामान्य जनतेची इच्छा आहे.
करवीर तालुक्यात पक्षाची पडझड झाल्याची कबुली देत आमदार हसन मुश्रीफ यांनी ही कसर भरून काढली जाईल, असे सांगितले . राज्यातील सत्ताधाऱ्यांवर मुश्रीफ यांनी टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, राज्य चालवण्याची क्षमता भाजप- शिवसेनेकडे नाही. चार वर्षांत पाच लाख कोटीचे कर्ज केल्याने राज्य कर्जात बुडाले आहे. भोंगळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. हे सरकार भिकारडे बनले आहे,असा प्रहार त्यांनी केला.
जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी संयोजकांनी आमदार मुश्रीफ यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्याचे ठरवले होते . त्यानुसार मुश्रीफ यांचा सत्कार केला पण भला मोठा पुष्पहार महाडिक यांनाही घालण्यात आला. एकाच हारात आमदार-खासदार सामावल्याने या मनोमिलनाला टाळ्यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.
महादेवराव महाडिक आमच्या बाजूला
कागलच्या रणांगणात ताकदीनिशी उतरू असे विधान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले होते , त्याचा संदर्भ देऊन आमदार हसन मुश्रीफ यांनी अन्य एका कार्यक्रमात महाडिक हेच पुढील काळात आमच्या बाजूने असतील. त्यांचा पक्ष निश्चित नसल्याने अशी स्थिती निर्माण होईल, असे ते म्हणाले .