कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंगळवारी दत्तनामात हरवले. दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी झाली. “दिगंबरा दिगंबरा” च्या जयघोषाने कृष्णा काठ दुमदुमला. सायंकाळी श्रींचा जन्मकाळ उत्साहात पार पडला.
श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तपसाधनेनंतर येथील कृष्णा पंचगंगा संगम काठावर औदुंबर वृक्षाच्या खाली भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनोहर पादुकांची स्थापना केली. याला या वर्षी ५९० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही येथे दत्तभक्ती करणाऱ्या प्रत्येक दत्तभक्ताला याची प्रचिती येत असते. यामुळे या क्षेत्रावर साजरा होणाऱ्या दत्तजन्मोत्सव सोहळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषाने पहाटे मंदिर परिसरात भाविक येत होते. पहाटे भूपाळी, काकडआरती व शोडषोपचार पूजा पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रीचे चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता पवमान पंचसुक्तांचे पठण झाले.
सायंकाळी ठीक पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यास प्रारंभ झाला. जन्मकाळाच्यावेळी श्रींच्या समोर ब्रम्हवृंदाकडून पाळणा व पारंपारिक आरत्या म्हटल्या गेल्या, जन्मसोहळ्यासाठी ब्रम्हवृंदानी नेटके नियोजन केले होते. सुंटवडा वाटप करण्यात आले.
मध्यरात्रीपासून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व इतर राज्यातून भाविक दत्त दर्शनासाठी येत होते. भाविकांनी उत्सवकाळात कृष्णा नदीत स्नानासाठी गर्दी केली होती. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. देवस्थानने जयंतीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती.