कोल्हापूर : देशातील लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. यावेळची लोकसभेची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक घटना आहे. आता आपण जागे नाही झालो तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. पैसा आणि पक्षफोडीच्या आधारे सत्ता काबीज करणारे विधीनिषेधशून्य नेते यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा राजकीय नैतिकता गमावलेले राज्य अशी मलीन झाली आहे ,अशी टीका ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, माजी कुलगुरु डॉ.माणिकराव साळुंखे यांच्यासह कोल्हापुरातील विविध ४० क्षेत्रातील मान्यवरांनी सोमवारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यामध्ये मुख्य सामना होत आहे. प्रचारातून एकमेकांवर टीका टिपणी होत आहे. तर दुसऱ्या बाजूला विविध क्षेत्रातील समाज धुरिणांनी एकत्र येऊन सांप्रत राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले आहेत. या काळात कोणती राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे यावर त्यांनी पत्रकार द्वारे भाष्य केले आहे.

हेही वाचा…त्याचे ठुमके आणि राजकीय डायलॉग बाजीने अभिनेता गोविंदाने इचलकरंजीकरांची मने जिंकली

पत्रकात म्हटले आहे, भारतातील क्रांतीकारक सामाजिक सुधारणांचा इतिहास असलेले प्रगत व सुसंस्कृत राज्य अशी महाराष्ट्राची ओळख होती. परंतू ती आज मलिन झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा आज निवडणूक आयोगाला स्वत:च्या अंकित ठेवून लोकशाहीसाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या निवडणूकांवर नियं६ण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. त्याविरोधात आता निर्भय बनून खुलेपणाने बोलण्याची गरज आहे. एक विवेकी, लोकशाहीवादी व्यक्ती म्हणून देशातील लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे.

हेही वाचा…लोकसभेची एकही जागा एकनाथ शिंदे, अजित पवार गटाला मिळणार नाही; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा

लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक घटना आहे. आता आपण जागे नाही झालो तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असे त्यात म्हटले आहे. पत्रकावर डॉ.यशवंत थोरात, डॉ. गणेश देवी, डॉ.अशोक चौसाळकर, सरोज पाटील, डॉ.उषा थोरात, डॉ. सुनिलकुमार लवटे, डॉ. राजन गवस, डॉ.मधुकर बाचूळकर, डॉ.टी.एस.पाटील, डॉ. भालबा विभुते, डॉ. विलास पोवार, सुरेश शिपूरकर, डॉ. शरद भुथाडिया, पवन खेबूडकर, डॉ.माया पंडित, डॉ.शरद नावरे डॉ.अरुण भोसले, दशरथ पारेकर, डॉ. भारती पाटील, डॉ..मेघा पानसरे, डॉ. मंजूश्री पवार, मीना सेशू, तनुजा शिपूरकर बाळ पाटणकर.डॉ.आय.एच.पठाण, व्यंकप्पा भोसले, हसन देसाई, गणी आजरेकर, एम.बी.शेख, प्रा.डी.यू.पवार, प्रसाद कुलकर्णी, हिंदकेसरी विनोद चौगले, माणिक मंडलिक, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, डॉ.उदय नारकर, अर्जुन देसाई, अनंत घोटगाळकर, भगवान चिले आदींच्या सह्याआहेत. या मान्यवरांनी लोकसभा निवडणूकीत कोल्हापूरातून शाहू छत्रपती व हातकणंगलेमधून सत्यजित पाटील सरुडकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dignitaries in kolhapur urge for democratic vigilance in lok sabha elections and appeal win shahu maharaj from kolhapur psg