विधान परिषदेच्या सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक साळुंखे यांच्या विरोधात पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच प्रशांत परिचारक यांनी महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवारी भरल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत असतानाच त्यात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे, महायुती पुरस्कृत शैलेंद्र ऊर्फ प्रशांत परिचारक, अपक्ष दिलीप माने यांच्यासह बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू विजय राऊत, राहुल सुभाष सावंत, अतुल बापूसाहेब विटकर (अपक्ष) अशा एकूण सहा जणांचे उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झाले होते. त्यापकी अतुल विटकर यांचा अर्ज छाननीत बाद ठरला. त्यामुळे साळुंखे, परिचारक व माने यांच्यासह पाच वैध अर्ज रिंगणात आहेत.
विधान परिषदेच्या सोलापूर जागेसाठी मतदारसंख्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त असल्याचा दावा करीत काँग्रेसने हक्क सांगितला होता. त्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी जोरदार तयारी केली होती. परंतु शेवटी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या आघाडीत सोलापूरची जागा राष्ट्रवादीकडेच कायम राहिली आणि राष्ट्रवादीनेही पुन्हा आमदार दीपक साळुंखे यांनाच संधी दिली. त्यामुळे दिलीप माने यांचा हिरमोड झाला. त्यातून त्यांनी पक्षनिष्ठेची भाषा बाजूला ठेवून अपक्ष उमेदवारी दाखल केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण उमेदवारी दाखल केली असून उमेदवारी कायम ठेवायची की माघार घ्यायची, याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बठकीतच ठरणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे हे अडचणीत येऊ शकतात, असे सांगितले जाते.
महायुतीने पुरस्कृत केलेले प्रशांत परिचारक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. उमेदवारी दाखल करताना माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे बंधू तथा काल-परवापर्यंत ‘अजितनिष्ठ’ म्हणून जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हलविणारे संजय शिंदे यांच्या उपस्थितीमुळे त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट झाली. संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीबरोबर आहेत.तर विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र विरोधकांबरोबर असल्याचे दिसून आले. सोलापूर जिल्हा बँकेत ‘दोस्ती’ आणि विधान परिषद निवडणुकीत ‘कुस्ती’ अशा संजय शिंदे यांच्या भूमिकेमुळे त्यांचे बंधू आमदार बबन शिंदे यांची राष्ट्रवादीसाठीची जबाबदारी अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. यातच आघाडीत बेबनाव होऊन काँग्रेसचे दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असताना दुसरीकडे सुमारे ३५ ते ४० मतांची बेगमी असलेले अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ओबीसी गटातून संचालकपद मिळण्यासाठी परिचारक यांच्याशी हातमिळवणी केल्याचे समजते. त्यामुळे म्हेत्रे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे बोलले जाते.
उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रशांत परिचारक यांनी, महायुतीची मतदारसंख्या कमी असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांशी आपले चांगले संबंध आहेत. त्यांची साथ हमखास मिळेल आणि निवडणूक निकाल चमत्कार घडविणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Story img Loader