कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद गोवामार्गे मुंबईत पोहोचला आहे. चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केली आहे. असे असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्यावेळचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील हे रिंगणात असतील, असे जाहीर केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. सावंत यांच्या या विधानावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत हा विषय देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला शासकीय निधीची वानवा

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व चंदगड या दोन मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केल्यावर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतली आहे. असेच वादाचे पडसाद शेजारच्या चंदगड मतदारसंघात दिसत आहेत.

येथे गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार म्हणून राजेश पाटील यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे पाटील समर्थकांनी थेट प्रचाराला सुरुवात केली. तोपर्यंत इकडे गेल्या वेळचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी हालचाली वाढवल्या आहेत. मुंबईत झालेल्या दहीहंडी समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पाटील यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली होती.

हेही वाचा >>> कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला शासकीय निधीची वानवा

चंदगडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी पाटील हे निवडणूक रिंगणात असतील आणि ते विजयी होतील, असे विधान केले होते. मुख्यमंत्री सावंत यांचे हे विधान महायुतीतील वादाला कारणीभूत ठरले आहे. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन वाद निर्माण करणे अयोग्य आहे, ‘ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. राजेश पाटील यांनी सावंत यांच्या विधानाला आक्षेप घेतला आहे. ‘महायुती अबाधित ठेवायची असेल आणि लोकसभेला ज्या पद्धतीने झाले ते विधानसभेला व्हायचे नसेल तर त्या पक्षातील नेत्यांनी इच्छुकांना समजावून सांगावे,’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. चंदगड मतदारसंघावरून महायुतीत पेटलेल्या वादाचे आता कसे निराकरण केले जाणार याकडे लक्ष लागले आहे.