क्रशर चौक परिसरात रविवारी रात्री माजी मंत्र्याच्या निकट असलेला स्थायी समितीचा माजी सभापती, नगरसेवक व मूळ पक्षात प्रवेशलेल्या माजी आमदार पुत्रामध्ये डिजिटल पोस्टर लावण्यावरून वाद झाला. वाद चिघळल्याने नगरसेवकाने चाकू उगारल्याचे पाहून माजी आमदाराने थेट बंदूकच नगरसेवकावर रोखली. यामुळे नगरसेवक व त्याच्या कार्यकर्त्यांची पळता भुई थोडी झाली. यामुळे मध्यरात्रीपर्यंत या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काहींनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडदा पडला. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील राजकीय वॉर बरोबरच डिजिटल वॉरही रंगात आल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू लागल्याचे दिसत आहे.
अंबाई टँक परिसरात निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसचा एक नगरसेवक व एक आमदार पुत्र इच्छुक आहेत. याच पाश्र्वभूमीवर या भागात डिजिटल फलक लावण्याचे काम नगरसेवक व माजी आमदाराचे समर्थक करत होते. एका ठिकाणी पोस्टर लावण्यावरून दोनही गटाच्या कार्यकर्त्यांच्यात वाद झाला. हा वाद नगरसेवक व आमदार पुत्रास समजला. मी नगरसेवक असल्याने या ठिकाणी माझे पोस्टर लागणार अशी भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या आमदार पुत्राने नगरसेवकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवकाने आपल्या जवळील धारदार शस्त्र बाहेर काढल्याने वातावरण बिघडले. दरम्यान या घटनेची माहिती माजी आमदारांना मिळाली. त्यांनी फिल्मी स्टाईलने घटनास्थळी एन्ट्री घेत आपल्या जवळील १२ बोअरची बंदूक त्या नगरसेवकावर रोखली. माजी आमदारांनी थेट बंदूक बाहेर काढल्याने उपस्थितांच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान उपस्थितांपकी काहींनी नगरसेवक, आमदार यांची समजूत काढत हे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत क्रशर चौक परिसरात तणाव निर्माण झाला होता.
क्रशर चौकात ५ सप्टेंबर रोजी याच नगरसेवक व अन्य पक्षातील एका कार्यकर्त्यांच्या पोस्टर लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा त्या नगरसेवकाचा वाद झाल्याने नगरसेवकांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा