लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे इचलकरंजी महापालिका कार्यक्षेत्रात पोहचण्याआधीच पक्षांतर्गत मध्ये तमतभेदाचे उसळी घेतली आहे. पक्षाचे महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पक्षाशी गद्दारी करून विधानसभा निवडणूक लढवली असताना पुन्हा त्यांच्यासमवेत शहरात पक्ष कार्यक्रम कसा घेतला जातो, असा खडा सवाल उपस्थित करीत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांची पक्षातून कायमस्वरूपी हकलपट्टी करावी, अशी मागणी अजितदादा यांच्याकडे केली आहे.
इचलकरंजी शहरात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीपासून दोन प्रमुख गट दिसत आहेत. शहराला महानगर जिल्हाध्यक्ष असा दर्जा आहे. या पदावर नेमके अधिकृत निवड कोणाची यावरून शहरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. काही दिवसांपूर्वी महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना बदलून तेथे बाळासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली होती. तर आता या पदावर नेमके कोण आहे? याबाबत पक्षाचे कार्यकर्तेच संभ्रमात आहेत. विठ्ठल चोपडे व बाळासाहेब देशमुख या दोघांकडूनही महानगर जिल्हाध्यक्ष आपणच असल्याचा दावा केला जात आहे. हाच वादग्रस्त विषय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौरा वेळी उफाळून आला आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने आज कोल्हापूर शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी बाळासाहेब देशमुख यांच्यासमवेत प्रदेश उद्योग विभाग अध्यक्ष सुभाष मालपाणी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष निहाल कलावंत, शहर कार्याध्यक्ष अमित गाताडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता .
इचलकरंजी विधानसभा निवडणुकीचे संदर्भ आजच्या वादाला कारणीभूत ठरले आहेत. इचलकरंजी मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला होता. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आदेश पक्षादेश अजित पवार यांनी दिले होते. तथापि महानगर अध्यक्ष पदावर असलेले असल्याचा दावा करणारे विठ्ठल चोपडे यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ती लढवली. त्यामुळे महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागला. हाच मुद्दा आज बाळासाहेब देशमुख व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिला. अजित दादांनी याबाबत निवेदन ही सादर केले आहे.
इचलकरंजी विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याची पक्षाची अधिकृत भूमिका असताना विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे त्यांना असे करूनही त्यांना केवळ २४६१ इतकी मते पडली. अशा बंडखोर उमेदवारासमवेत अजित दादा पुन्हा कसे जात आहेत, असा परखड प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. गद्दारांना पक्ष स्थान मिळणार असेल तर पक्षासोबत राहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे फळ नेमके काय , असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काही वेळात अजित दादा हे इचलकरंजीत पोहोचणार असून तेथे राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसमोर बैठक घेणार आहेत. या बैठकीवेळी पक्षांतर्गत मतभेद उफाळून येण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.