कोल्हापूर : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यासाठी प्रशासनाकडून बुधवारी दिवसभर प्रयत्न झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा न हटवता तो झाकून ठेवावा, असा आदेश दिल्याने कोंडी फुटली. पट्टणकोडोली गावात प्रशासनाची परवानगी न घेता शिवरायांचा पूर्णाकृती शिवपुतळा उभारण्यात आला होता. तो हटवण्यासाठी आज अचानक गावात संचारबंदी लागू करून, फौजफाटा तैनात करत प्रशासनाने पुतळा काढण्याच्या हालचाली केल्या. आक्रमक शिवप्रेमींनी पुतळा न हटवण्याचे आवाहन करीत जोरदार घोषणा दिल्या.
उपमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
दरम्यान, शिवरायांचा पुतळा आहे तसाच झाकून ठेवावा. पुतळ्यासाठी रीतसर परवानगी लवकर देऊ. त्यानंतर पुतळा खुला करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या. यानंतर पुतळा झाकण्याचे काम सुरू झाले. या वादात तब्बल ५ तास वाहतूककोंडी झाली होती.
पोलिसांचा लाठीचार्ज
गावात तणावपूर्ण वातावरण बनल्याने, काही ठिकाणी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये किरकोळ वाद झाल्याने थेट लाठीचा प्रसाद देण्यात आला. मध्यवर्ती भागात मोठा फौजफाटा तैनात होता.