कोल्हापूर : खरे तर ते दोघेही कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातले वरिष्ठ आणि मातब्बर. एकाने तीन वेळा आमदार होतानाच कॅबिनेट मंत्रिपद हे जबाबदारीचे पद भूषवलेले. दुसऱ्याने तर सहा वेळा विधानसभेवर झेंडा रोवतानाच कॅबिनेट मंत्रेपद तर सातत्याने निभावलेले. तरीही या दोघांनी नवख्या आमदाराकडे मंत्री-पालकमंत्री पद आल्यानंतर सांभाळून घेण्याऐवजी ‘कानामागून आली तिखट झाली’ अशा काहीश्या जळजळणाऱ्या नाराजीचे वाग्बाण डागायला सुरुवात केल्याने याची चर्चा होत आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या दोघांच्याही बोलण्यातून प्रकाश आबिटकर यांच्याकडे आरोग्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आल्याने नाराजी लपता लपत नसल्याचे त्यांच्या विधानातून अधोरेखित होत आहे. यानिमित्ताने पालकमंत्रिपदावरून महायुतीतील नाराजी वेशीवर टांगली गेली आहे.

आणखी वाचा-राज्यातील पारंपरिक विणकरांना मदतीचा हात! राज्य शासनाच्या वतीने दिला जाणार ‘उत्सव भत्ता’

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने सर्व दहा जागांवर विजय मिळवला. नंतर जिल्ह्यात मंत्रिपद कोणाला मिळणार, याकडे लक्ष वेधले गेले. राधानगरी मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर मंत्रिपद देण्याचा शब्द शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना थेट कॅबिनेट मंत्री; तेही आरोग्यसारख्या महत्त्वपूर्ण खात्याचे देवून पाळला. आबिटकर यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांनी आनंद व्यक्त केला खरा; पण स्वागताला जाण्याचे टाळून मनातील खदखद उघडपणे व्यक्त केली. इतकेच नव्हे तर, अडीच वर्षांनंतर आपल्याकडेच मंत्रिपद येणार याचा ठामपणे विश्वासही ते वेळोवेळी व्यक्त करीत राहिले. कालही एका कार्यक्रमात त्यांनी आपल्याकडे मंत्रिपद यायला हवे होते, हे शल्य बोलून दाखवले. हे झाले क्षीरसागर यांच्या बाबतीत.

दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांना त्यांच्या म्हणण्यानुसार आवडीचेच वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद मिळाले. पण, कोल्हापूर ऐवजी दूरच्या वाशिमचे पालकमंत्रिपद मिळाल्याने ते खट्टू झाले. सोमवारी पत्रकारांशी बोलताना ‘कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील मीच खरा पालकमंत्री’ आहे, असे म्हणत त्यांनी नाराजीचे उघड दर्शन घडवले.

आणखी वाचा-चौपट भरपाई दिल्यावरच रत्नागिरी – नागपूर महामार्ग, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा इशारा

पक्षातील कनिष्ठ असणाऱ्या प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शकाची भूमिका घेण्याऐवजी क्षीरसागर हे अनेक कार्यक्रमांमध्ये या ना त्या मार्गाने खदखद व्यक्त करीत चालले आहेत. मुश्रीफ यांचेही त्याहून काही वेगळे चालले नाही. या दोघांनाही कालचा कनिष्ठ आज वरिष्ठ (वरचढ) ठरल्याची बोचणी लागली असावी, असा निष्कर्ष कोल्हापूरकरांनी काढला, तर त्यात गैर ते काय?

Story img Loader