काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा जीव विधानसभेच्या पोपटात अडकला आहे. तो भेदण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आजरा साखर कारखाना निवडणुकीत अतुल्य कामगिरी करणाऱ्या महाआघाडीने पुढचे पाऊल टाकावे, असे मत मांडत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचे जिल्ह्याच्या दक्षिण भागात रणिशग फुंकले. ते म्हणाले, ६ कोटी सभासदसंख्या असलेल्या सहकार क्षेत्राला मोडीत काढण्याइतके आम्ही वेडे नाहीत. साखरसमृद्ध व्हावा यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत.

आजरा कारखाना निवडणुकीत स्व. वसंतराव देसाई आघाडीच्या आजरा येथे आयोजित विजयी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून सहकारमंत्री पाटील बोलत होते. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा सहकारी साखर कारखानदारीत प्रवेश झाला आहे. त्यामुळे स्व. वसंतराव देसाई विकास आघाडीने मिळवला असून, संचालक मंडळाने कारखाना नीट व आदर्शवत पद्धतीने चालवावा. सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहील, असा विश्वास व्यक्त करीत शासन त्यांचा सोबत असल्याचे सांगितले. आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, जिल्हा परिषद निवडणूक महाआघाडीमार्फत लढवणार आहोत. आजरा साखर कारखान्याची निवडणूक जनता विरुद्ध नेते अशी झाली. यामध्ये जनतेचा विजय झाला. या वेळी सहकारमंत्री पाटील व महादेवराव महाडिक यांनी केलेली मदत आपण कदापिही विसरणार नाही. शाहू साखर कारखान्याप्रमाणे तोडणी यंत्रणा राबवली जाईल. आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, भूमिपुत्र म्हणून आम्ही या भागात लक्ष घालत असून त्याचा कोणी गर अर्थ काढू नये. सह्याद्री साखर कारखाना उभारण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. हसन मुश्रीफ यांच्या खासगी साखर कारखान्याला डिस्टिलरी प्रकल्प आम्हीच मंजूर केला असल्याने त्यांनी याची लाज बाळगून टीका करण्याचे थांबवावे. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे यांचीही भाषणे झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष िहदुराव शेळके, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, संग्राम कुपेकर, राजू गडय़ान्नावर, बाबा देसाई, सरपंच शीला सावंत उपस्थित होते. विष्णुपंत केसरकर यांनी आभार मानले.