परंपरेप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व जिल्हा परिषद निवडणुकीत दिसले असले तरी ज्या वेगाने या सहकाराच्या पट्टय़ात भाजपचे कमळ फुलले आहे ते दोन्ही काँग्रेसची झोप उडवण्यास पुरेसे ठरले आहे. वसंतदादांच्या सांगली जिल्ह्य़ात तर भाजप स्वबळावर सत्ता प्राप्त करत आहे. सोलापुरातही कमळ वेगाने उगवले असले तरी येथे राष्ट्रवादीसह काँग्रेस, शेकाप व शिवसेना असे नवे सत्तासमीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. कोल्हापुरात सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे असल्याने दोन्ही काँग्रेस व भाजपला निर्णयासाठी लटकत राहावे लागणार आहे. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले असले तरी त्यांचे संख्याबळ घटले आहे.

सांगलीत दोन्ही काँग्रेसची धूळधाण

काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांना आपल्या जावयाची जागाही राखता आली नाही. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना जिल्हा परिषदेतील सत्ता टिकवता आली नाही. ६० जागा असलेल्या सांगली जिल्हा परिषदेत भाजपने शून्यावरून सुरुवात करीत तब्बल २४ जागंवर विजय मिळवून कमाल केली आहे. सामूहिक प्रयत्नाचे यश कसे असते याचा हा उत्तम दाखला आहे. शिवसेनेने तीन जागा मिळवत आपली कामगिरीही उंचावली आहे. सत्तेची काही नवी समीकरणे ऐन वेळी तयार होणार का, याकडे लक्ष राहिले आहे. राजू शेट्टी यांचा टोकाचा विरोध असतानाही कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुत्रास िरगणात उतरवले खरे, पण पुत्र सागरच्या पराभवाने खोत यांची जनमानसातली ताकद किती हा नवा वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

सोलापुरात कमळ

सोलापुरात प्रथमच कमळ तरारून उगवले आहे. ६८ जागांपकी १७ जागा जिंकत भाजपने वाढलेल्या राजकीय ताकदीचा प्रत्यय आणून दिला आहे. पण इतक्या संख्याबळाच्या आधारे सत्ता मिळवणे अंमळ कठीण होणार आहे. येथे दोन्ही काँग्रेसच्या प्रत्येकी १० जागा कमी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या जागा ३५ वरून २५ पर्यंत खालावल्या आहेत. ग्रामीण भागातील दोन्ही काँग्रेसचा आलेख उतरणीला लागला असला तरीही येथे राष्ट्रवादीसह काँग्रेस, शेकाप व शिवसेना हे पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

सातारा राष्ट्रवादीकडे; भाजपचा शिरकाव

राज्यात सर्वत्र धूळधाण होत असताना साताऱ्याचा गड राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. परंतु हा गड राखतानाच त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. ६४ जागांच्या या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने ३९ जागा जिंकत निर्वविाद यश मिळवले आहे. पण मागच्या वेळीपेक्षा त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात भाजपाला सहा जागांवर मिळालेला विजय सगळ्यांच्याच भुवया उंचवायला लावणारा आहे. पाटण विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला माफक यशावर समाधान मानावे लागले. सातारच्या गादीच्या वारसदारांमधील वादामुळे हा जिल्हा चच्रेत होता. खासदार उदयनराजे यांनी सातारा विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादी व बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान दिले होते. पण उदयनराजेंची आघाडी फारशी कामगिरी दाखवू शकली नाही.

कोल्हापूर अनिश्चितकडे

कोल्हापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये यंदा चुरस आहे. सर्वच पक्षांना थोडय़ाफार जागा मिळाल्याने शिवसेना, जनसुराज्य पक्षांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत जिल्ह्य़ातील मतमोजणी सुरू होती. एकूण ६७ जागांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांना या वेळेपर्यंत साधारण दहा जागांवर विजय संपादन केला होता. या निकालावरून सत्ता कुणाची येणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस संख्याबळ कमी करूनही राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्ता राखणार  की भाजप, जनसुराज्य या मित्रपक्षांच्या सोबतीने सत्ता मिळवणार याची आकडेमोड सुरू झाली आहे. यामध्ये आता भाजपशी काडीमोड घेतलेल्या शिवसेनेच्या भूमिकेकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नगरमध्ये राष्ट्रवादीला धक्का

नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अवस्था त्रिशंकूकडे गेली आहे. यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये निम्म्याने घट झाली आहे. सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. चाळीस जागांचा दावा करणारे पालकमंत्री राम शिंदे व त्यांच्या भाजपचे विमान जमिनीवरच राहिले असले तरी त्यांच्या जागांत दुपटीने वाढ झाली आहे. काँग्रेसने २२, राष्ट्रवादीने १८, भाजपने १४ तर शिवसेनेने ७ जागा मिळवल्या. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या गटाने ५ तर अपक्ष ५ व एक कम्युनिस्ट असे संख्याबळ निर्माण झाले आहे. गेल्या वेळीपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा निम्म्याने कमी होऊन त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने काँग्रेसला सोबत घेत सत्ता प्राप्त केली होती. यंदा सेनेच्या जागांत दोनने वाढ झाली आहे. सत्तेचा जादूई अकडा गाठण्यासाठी ३७चे संख्याबळ आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या ताब्यातील अकोल्याची तर सध्या भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या ताब्यातून कोपरगाव पंचायत समितीची सत्ता हिरावली गेली आहे.

पुण्यात राष्ट्रवादीने गड राखला

पुणे आणि िपपरी- चिंचवड महापालिकांतील सत्ता भारतीय जनता पक्षाने खेचून घेतली असली, तरी पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कायम ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले. एकूण ७५ जागांपैकी जवळपास ४२ जागाजिंकत राष्ट्रवादीने निर्विवाद बहुमत सिद्ध केले. बहुतांश तालुक्यात सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादीने पटकावल्या. शिवसेना १४ जागा मिळवित दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भारतीय जनता पक्षाने यंदा प्रथमच या निवडणुकीसाठी जोर लावत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले होते. त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नसले, तरी काही ठिकाणी भाजपचा प्रवेश झाला आहे.

 

Story img Loader