राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पंधरा वष्रे सत्ता असतानाही कोल्हापूरमधील मूलभूत विकासाचे प्रश्न कायम आहेत. रस्त्याची दुरवस्था झाली आहे, पिण्याचे स्वच्छ पाणी अद्याप मिळत नाही, अशा स्थितीत सत्ताधाऱ्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी नेमके केले तरी काय, असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी येथे प्रचार सभेमध्ये उपस्थित केला.
भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री मुंडे यांचा सोमवारी प्रचारदौरा पार पडला. शहरात चार ठिकाणी सभा घेताना मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर टीकेची तोफ डागली. त्या म्हणाल्या, दोन्ही काँग्रेसवाल्यांनी खरेच विकासाचे काम केले असते तर त्यांना शहरात मोठमोठे फलक उभे करून अपप्रचार करण्याची गरज लागली नसती.
देशातील वंचित समाजाचा विकास भाजपाने केला आहे, असा उल्लेख करून मुंडे म्हणाल्या, कष्टकरी जनतेच्या समस्या सोडविणे ही भाजपाची भूमिका आहे. कोल्हापूरचा सर्वागीण विकास केवळ भाजपाच करू शकेल. पालकमंत्र्यांच्या स्वप्नातील स्मार्ट कोल्हापूर साकार करण्यासाठी आमचे उमेदवार निवडून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापुरात
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी करवीरनगरीत प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. अनेक प्रभागात जाऊन ते प्रचार करणार आहेत. तर सायंकाळी प्रायव्हेट हायस्कूल येथे मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार आहे. भाजपाचे प्रतिनिधींचे अधिवेशन मे महिन्यात पार पडले, तेव्हा मुख्यमंत्री शहरात आले होते. सहकार परिषदेवेळचा त्यांचा कोल्हापूर दौरा मुंबईतील पावसामुळे रद्द झाला होता.

Story img Loader