शिराळ्यात नागपंचमीवेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत क्षमतेपेक्षा दुप्पट आवाजाने सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी १० डॉल्बी वाहने शिराळा पोलिसांनी जप्त केली आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गणेश मिरवणुकीतील ध्वनिवर्धक वापरणाऱ्यांना सूचक इषारा दिला आहे.
शिराळा येथे नागपंचमीनिमित्त नागमंडळांनी डॉल्बीच्या दणदणाटात मुख्य बाजार पेठेत जल्लोषी मिरवणुका काढल्या होत्या. ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करीत या मिरवणुका काढण्यात आल्याने आवाजाची चाचणी त्यावेळी घेण्यात आली होती. मुख्य बाजार पेठेत आवाजाची कमाल मर्यादा ६५ डेसिबल असतानाही प्रत्यक्ष ध्वनियंत्रावर याची तीव्रता ११० हून अधिक असल्याचे दिसून आल्याने १४ नागमंडळे आणि डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकारी अनिल गुजर यांनी सांगितले.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांपकी १० डॉल्बी ध्वनियंत्रणा वाहनासह पोलिसांनी रविवापर्यंत जप्त केल्या असून त्याची किंमत दोन पासून ५ लाखापर्यंत असल्याचे श्री. गुजर यांनी सांगितले. यंदा जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून कोणत्याही स्थितीत नियमांचे पालन करण्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे. ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बठकीत दिला आहे. या पाश्र्वभूमीवर शिराळ्यात झालेली कारवाई डॉल्बी चालकांना एक इशारा मानला जात आहे.
शांततेचा भंग केल्याप्रकरणी डॉल्बी वाहने जप्त
शांततेचा भंग केल्याप्रकरणी १० डॉल्बी वाहने शिराळा पोलिसांनी जप्त केली आहेत.
Written by बबन मिंडे
First published on: 07-09-2015 at 02:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dolby vehicle seized in issue of silent zone