कोल्हापूर : बिद्री कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्प उभारणीपासून ते उत्पादन सुरु होईपर्यंत वेळोवेळी या प्रकल्पाला अडचणीत आणण्याचे काम काही शक्तींनी केले आहे. बिद्री कारखाना कुणाची वैयक्तिक मालमत्ता नसून तो तमाम ६५ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. त्यावर साखर कामगार, तोडणी मजूर, वाहतूकदार, ऊस उत्पादक शेतकरी, व्यावसायीक या सर्वांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून या डिस्टलरीकरिता सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. राधानगरी-भुदरगडमधील विधानसभेच्या राजकारणाचा बिद्री कारखाना राजकीय अड्डा होऊ न देता चांगला प्रकल्प बंद पाडण्याचे पाप विघ्नसंतोषी लोकांनी आपल्या माथी घेऊ नये, असे, आवाहन माजी अध्यक्ष , माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी केले आहे.
राज्य उत्पादन शुल्कने बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टलरीचा परवाना रद्द करण्याच्या कारवाईविषयी आपली भूमिका मांडताना ते बोलत होते. जाधव म्हणाले, मी पण १९८५ ते २००५ पर्यंत बिद्रीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. तत्कालीन परिस्थितीत माझ्या विरोधात असलेले माजी आमदार कै. शंकर धोंडी पाटील असतील किंवा त्यावेळचे आमदार बजरंगअण्णा देसाई असतील त्यांनी कधीही कारखान्याच्या कामकाजामध्ये प्रशासकीय स्तरावर कधीही हस्तक्षेप केला नाही. सत्तेचा गैरवापर करुन शासकीय अधिकाऱ्यांकडून कधीही त्रास झाला नाही.
आणखी वाचा-कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुस्त कारभाराविरोधात निदर्शने
पण आजचे चित्र भयावह आहे. वैयक्तिक मतभेदातून बिद्री सारख्या मातृसंस्थेला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून डिस्टलरीकरिता सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. कारखान्यात काही चुकीचा कारभार होत असल्यास त्यावर आपण जरूर आवाज उठवावा. त्यासाठी शासकीय पातळीवर जरुर पाठपुरावा करावा. पण डिस्टलरी प्रकल्प बंद पाडण्याचे पाप आपल्या माथी घेऊ नये, अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली आहे.