कोल्हापूर : प्राप्तिकर रक्कम पूर्णपणे भरल्यानंतर पुरस्कार दिला जातो. तरीही पुरस्काराच्या रकमेवर केंद्र सरकारकडून नव्याने कर आकारला जातो. एकाच रकमेवर दोनदा करआकारणीचा हा प्रकार नव्हे का, असा प्रश्न घेत ‘फाय’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती पंडितराव कुलकर्णी यांनी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्यापुढे मांडणी केली आणि या अर्थतज्ज्ञाने हा मुद्दा तत्काळ ग्राह्य धरत पुरस्कारावरील ही दुहेरी कररचना कायमची रद्द केली. कर कायद्यात महत्त्वाचा बदल घडवणारी ही घटना इचलकरंजीत डॉ. मनमोहन सिंग यांच्या साक्षीने घडली. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच या निर्णयाचे स्मरण अनेकांना झाले. तत्कालीन पुरस्कार समारंभाचे सूत्रधार डॉ. एस. पी. मर्दा यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना या आठवणी जागवल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इचलकरंजीतील ‘फाय’ (फ्युएल इन्स्ट्रुमेंट अँड इंजिनीअरिंग प्रा. लि.) संस्थेचे सर्वेसर्वा, उद्योजक, इचलकरंजीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव कुलकर्णी हे त्यांच्या ‘फाय फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने दर वर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करीत असत. इचलकरंजीसारख्या छोटेखानी शहरात ८०-९० च्या दशकात देशभरातील विविध क्षेत्रांतील नामवंत पुरस्कार स्वीकारण्यासाठी हजर राहत असत. पुरस्कार प्रदान करण्यासाठीही तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या नामवंतांनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा >>>इचलकरंजी सुवर्णमहोत्सवी साहित्य स्मृती ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव

सन १९९३ मध्ये या कार्यक्रमाला त्या वेळी देशाचे अर्थमंत्री असलेले डॉ. सिंग यांनी हजेरी लावली होती. त्यांची उपस्थिती हेरून संयोजक कुलकर्णी यांनी देशभरात पुरस्कार रकमेवर आकारल्या जाणाऱ्या दुहेरी कराची चूक लक्षात आणून दिली. उत्तरादाखल केलेल्या भाषणात डॉ. सिंग यांनी याचा विचार करू, असे आश्वासन दिले. राजकारण्यांचेच आश्वासन ते, असे समजून मंडळी नेहमीच्या कामाला लागली. परंतु, डॉ. मनमोहन सिंग यांच्यातील प्रामाणिक आणि कार्यतप्तर मंत्र्याने ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवली आणि दिल्लीला जाताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली. इचलकरंजीसारख्या छोट्या गावात मांडलेला हा मुद्दा केंद्र सरकारने स्वीकारला आणि कायद्यात आवश्यक ते बदल केले. देशभरात पुरस्कारावर आकारला जाणारा दुहेरी कर रद्द करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय घेऊनच ते थांबले नाहीत, तर तो घेत असल्याचे आणि चूक लक्षात आणून दिल्याबद्दलचे आभार त्यांनी ‘फाय’ उद्योगसमूहाला कळवले.

एक राहून गेलेली चूक लक्षात येताच दुरुस्त करणे, ती करताना लक्षात आणून देणाऱ्याचेही आभार मानणे, यानेच त्या वेळी सर्वजण भारावले होते. व्यक्तीचे मोठेपण हे त्याच्या पद, अधिकारापेक्षाही चारित्र्य आणि विवेकामध्ये कसे असते, याचेच हे उदाहरण होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Double tax on awards remembering dr manmohan singh decision making skills kolhapur news amy