बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताने कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाची चर्चा होत आहे. मात्र, त्यांना गेल्या काही दिवसांपासून विस्मरण होत आहे. त्यातून हा प्रकार घडला असावा, असे मत व्यक्त होत आहे.
डॉ. पाटील हे अनेक वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. काँग्रेसच्या माध्यमातून ते आमदार ते राज्यपाल असा प्रवास करु शकले. काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी त्यांचे आणि त्यांचे सुपुत्र माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांचे उत्तम संबंध आहेत. तरीही त्यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने कोल्हापुरात आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना यामुळे धक्का बसला आहे.
मात्र, ही घटना गंभीर असली आणि तिचे तितकेच गंभीर परिणाम राजकीय पटलावर उमटणार असल्याने हात ते घड्याळ असा प्रवास कसा घडला याची माहिती घेतली जात आहे.
खात्रीशीर माहितीनुसार डॉ. पाटील यांना विस्मरणाचा त्रास होत आहे. अगदी काही मिनिटांपूर्वी आपण काय बोललो हे त्यांना आठवत नाही. सतत तीच ती गोष्ट ते सहकाऱ्यांना विचारत असतात. या विस्मरणातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असावा, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्यातील हा बदल लक्षात घेऊन हा खेळ केला असल्याचे कार्यकर्ते सांगतात.