योगोपचाराच्या सहाय्याने आरोग्यसंपदा वृद्धिंगत करता येते याचा वस्तुपाठ घालून देणारे येथील प्रसिद्ध योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे शुक्रवारी ८० व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. ‘निरोगी राहू या आनंदाने जगू या’ हा संदेश देणाऱ्या त्यांच्या शिबिरांनी आजवर ८७५ चा आकडा पूर्ण केला आहे. १९८३ पासून ते अशी शिबिरे घेऊन योगप्रसाराचे कार्य करीत असून या विषयाच्या प्रसारासाठी त्यांनी आजवर परदेशातही १४५ शिबिरे घेतली आहेत. एका व्यक्तीने कोणत्याही संस्थेच्या आधाराशिवाय गेली ३३ वष्रे अथकपणे योग्य शिबिर घेऊन लोकांना निरामय जगण्याचा मंत्र देणारे डॉ. गुंडे यांची विक्रमी कामगिरी ठरावी.
पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ‘योग’चा जगभर प्रचार होऊ लागला आहे. योगाचा सराव करवून घेणाऱ्यांचा भाव वधारला आहे. मात्र डॉ. गुंडे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. स्वतला झालेला आजार औषधे घेऊन बरा न झाल्याने त्यांनी योगसाधना केली. त्याचा त्यांना फायदा होण्याबरोबरच मद्यपानाचे व्यसनही सुटले. तेव्हापासून, म्हणजे १९८३ पासून त्यांनी योग शिबिरांच्या माध्यमातून लोकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचा जणू वसा घेतला. स्वर्गीय डॉ. एच. एन. फडणीस यांना डॉ. गुंडे गुरुस्थानी मानतात.
१९८८ मध्ये त्यांच्याकडे मुंबईतील ‘बॉम्बे हॉस्पिटल’च्या योग विभागाची जबाबदारी देण्यात आली. तोवर असा विभाग कोठेच सुरू नव्हता. योगसाधनेने हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदी रोगांना आवर कसा घालता येतो, याची माहिती त्यांनी डॉक्टरसह रुग्णांना दिली. पुढे त्यांनी या योगसेवेचा विदेशातही प्रसार केला. १९९० पासून त्यांनी तब्बल १० देशांत योग शिबिरे घेतली आहेत. पुढे त्यांनी पहिली हास्ययोग चळवळ १९८८ साली सुरू केली असून आता हे कार्य देशात सर्वत्र सुरू झाले आहे. योगविषयक व्याख्याने, त्यावरचे लेखन सतत सुरू असते. आजवर त्यांची या विषयावर ६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
राष्ट्रपती, पंतप्रधानांवरही उपचार
के . आर . नारायणन हे राष्ट्रपती असतानाची गोष्ट. प्रजासत्ताक दिनाची सलामी स्वीकारण्याची तयारी सुरू असतानाच त्यांच्या पाय बधिर होण्याच्या त्रासाने उचल खाल्ली. अनेकांचे अनेक प्रयत्न, उपचार थकले. तेव्हा डॉ. गुंडे यांनी त्यांच्यावर साधे सोपे योगोपचार केले आणि त्यांना बरे वाटू लागले. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनाही गुंडे यांचा उपचार लाभदायक ठरला होता.