कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने तुळजाभवानी मंदिरात पार पडला. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, यंदा दसरा चौकात होणाऱ्या शाही दसऱ्याच्या कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. काही आठवड्यांपूर्वी श्रीमंत शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चर्चा करुन हा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्याने परिस्थितीचं भान राखतं साध्या पद्धतीने दसरा साजरा केला.
श्रीमंत शाहू महाराज यांच्याहस्ते विधिवत पूजा पार पडली, यानंतर आरतीचा कार्यक्रम झाला. शमीच्या पानांचं पूजन केल्यानंतर विधिवत सोने वाटपाचा कार्यक्रमही पार पडला. खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्यासह निवडक लोकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत यावेळी हा शाही दसरा पार पडला. छत्रपतींच्या घराण्यात कोल्हापूरच्या गादीला मोठा मान आहे. नवरात्र आणि दसरा हा छत्रपती राजघराण्याचा कुळाचार आहे. वर्षातील नऊ दिवस या घराण्यातील व्यक्ती कोल्हापूरच्या बाहेर जात नाहीत.
मात्र यंदा पहिल्यांदाच संभाजीराजेंनी हा शिरस्ता मोडला आणि ते मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ६ दिवस बाहेर पडले. दसरा चौकात शाही दसऱ्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सोनं लुटण्यासाठी कोल्हापूरकरांची नेहमी गर्दी होत असते. मात्र यंदा करोनामुळे त्यांना या सोहळ्यावा मुकावं लागलं.