कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप सुरू राहिली. तरीही नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत चालली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्यास सव्वा फुटाचे अंतर उरले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील २६ मार्ग बंद झाले आहेत. राधानगरी, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी येत राहिल्या. रक्षाबंधना साठी बाहेर पडलेल्या लोकांना पावसाचा सामना करावा लागला.पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार कायम आहे.
धरणातून विसर्ग वाढला
राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा आज उघडण्यात आला. त्यातून ७३१२ क्युसेस विसर्ग सुरू आहे. कोयना, चांदोली, राधानगरी, काळमवाडी या प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला असल्याने नदीकाठच्या लोकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पंचगंगा धोका पातळी नजीक
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. काल सायंकाळी सहा वाजता ३९ फूट ८ इंच असणारी पातळी गुरुवारी याच वेळेला ४१ फूट ८ इंच होती. दुपारी एक वाजल्यापासून पाणी पातळी स्थिर राहिली. मात्र धरणातून विसर्ग वाढला असल्याने पंचगंगा नदी ४३ फूट या धोका पातळीवर पोहोचण्यास सव्वा फुटाचे अंतर उरले आहे. जिल्ह्यात ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ७ त राज्य तर १८ जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. याचा दळणवळणावर परिणाम झाला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.