दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगार टंचाई निर्माण झाली आहे. या पाच राज्यांतील कामगारवर्ग प्रचार आणि मतदानासाठी गेल्या महिन्यापासून आपापल्या राज्यांत गेल्याने महाराष्ट्रातील उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

 लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून मानल्या गेलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये मतदान झाले असून, उद्या, रविवारी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात कार्यरत असलेले या राज्यांतील मोठय़ा संख्येने कामगार निवडणुकीच्या प्रचारमोहिमेपासून आपापल्या गावी आहेत. बदलत्या राजकारणात आता सेवाभावी कार्यकर्ता कमी होऊन ‘पगारी’ कार्यकर्त्यांची चलती असल्याने या परप्रांतीय कामगारांना अचानक मोठी मागणी निर्माण झाली. यातूनच हे हजारो कामगार त्यांच्या राज्यांमध्ये परतल्याचे उद्योजक सांगतात.

गेले महिनाभर हे कामगार आपल्या मूळ गावी मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळे उद्योजकांना दसऱ्यापासूनच परप्रांतीय कामगारांची कमतरता जाणवत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी ५०० रुपये दिले जातात. तेलंगणमध्ये यासाठी एक पत्ती (५००), दोन पत्ती (एक हजार रुपये) अशी भाषा प्रचलित आहे. शिवाय नाश्ता, जेवण, वाहनाची सोय केलेली असते. रोखीने पैसे मिळत असल्याने या कामगारांनी प्रचारक म्हणून काम करणे पसंत केल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >>>इचलकरंजीसाठी २५ इलेक्ट्रॉनिक बस मिळणार; खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योग, फाउंड्री इंजिनिअिरग, बांधकाम आदी उद्योग-व्यवसायामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. फाउंड्री इंजिनिअिरग, वस्त्रोद्योगात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तर बांधकाम क्षेत्रात तेलंगण राज्यातील कामगार मोठय़ा संख्येने आहेत. हे कामगार दसरा-दिवाळीच्या सुटीसाठी म्हणून गावाकडे गेले होते. नंतर प्रचार मोहिमेमध्ये अडकून पडले. आता निकालानंतर ते कामाच्या ठिकाणी परतण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्ह्यात फाउंड्री इंजिनिअिरग उद्योगात अंगमेहनतीचे काम करणारा परप्रांतीय श्रमिकांचा वर्ग लक्षणीय आहे. हे कामगार सुरुवातीला दसरा, दिवाळी आणि नंतर निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने गावीच अडकून पडले. त्यामुळे आमचे उत्पादन २० टक्क्यांनी घसरले आहे. – महेश दाते, उद्योजक, वेद इंजिनीअिरग इंडस्ट्रीज लि., लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत, हातकणंगले

महाराष्ट्रात सूतगिरण्या, यंत्रमाग, वस्त्रोद्योगात राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मध्य प्रदेश या राज्यांतील कामगारांची संख्या मोठी आहे. दिवाळीसाठी गावी गेलेले हे कामगार निवडणुकीमध्ये प्रचारक म्हणून राबले. यामुळे राज्यात कामगारटंचाई जाणवत असून, याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. – अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ

परिणाम काय?

’इचलकरंजीत यंत्रमाग कारखान्यांच्या उत्पादनात २० ते ३० टक्क्यांची घट

’सूतगिरण्यांमध्ये तीनपैकी एक पाळी बंद

’फाउंड्री इंजिनिअिरग उद्योगात २० टक्के उत्पादन घट

’मजुरांअभावी बांधकाम क्षेत्रातील कामावर परिणाम

(कोल्हापुरातील यंत्रमाग व्यवसाय सध्या अपुऱ्या मनुष्यबळावर कसेबसे कार्यरत आहे.)

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the elections of five states there is labor shortage in many places in maharashtra amy
Show comments