शरद पवारांच्या भूमिकेमुळे कोल्हापुरात पक्षात खळबळ

लोकसभा निवडणुकीसाठी नवे मित्र जमवताना जुना सहकारी गमवावा लागल्याचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोल्हापुरातील दौऱ्यात दिसून येत आहे. आजवर हाडवैर असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक , खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोटय़ातून हातकणंगले मतदारसंघ सोडून मैत्रीचा हात पवार यांनी पुढे केला. पण, या निर्णयाने निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आजवर शेट्टी यांना विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यातर पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असून त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजप किंवा शिवसेना प्रवेशाच्या विचारात आहेत. यामुळे बेरजेचे राजकारण करणारे पवार कोल्हापूर दौऱ्यात काही जमवतानाच काही गमावतानाही दिसत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातही शरद पवार यांचा कोल्हापूर जिल्ह्यवर जीव अधिक. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपले उमेदवार यापूर्वी निवडून आणले आहेत. आता लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु असताना राष्ट्रवादीतच अस्वस्थता आहे. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांना  विरोध होत आहे, तर हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा निवेदिता माने नाराज आहेत. हातकणंगले मतदासरसंघ राजू शेट्टी यांना सोडला जाणार असल्याची कुणकुण लागल्यावर माने यांनी मेळावा घेऊन पक्षाला ‘जय महाराष्ट्र ‘ करण्याचा इशारा दिला आहे.

इचलकरंजी परिसरात माने गटाची मोठी ताकद आहे. निवेदिता माने या दोनवेळा खासदार होत्या, तर त्यांचे सासरे बाळासाहेब माने हे काँग्रेसकडून पाचवेळा संसदेत पोहोचले होते. निवेदिता माने या नाराज असल्याचे उघड असतानाही त्याची दखल ज्येष्ठ नेते या नात्याने शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावेळी घेतील, अशी माने गटाची अटकळ होती. पण झाले भलतेच. पवार यांनी काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत राजू शेट्टी यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. खेरीज, दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत हातकणंगलेची जागा शेट्टी यांच्यासाठी सोडण्याची तयारी दर्शवली. यामुळे माने गट दुखावला आहे. परिणामी,  शनिवारी पवार माने यांच्या रुकडी गावात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी पोहोचले. पण, निवेदिता माने यांनी गावच्या वेशीवर पवारांचे स्वागत केले मात्र कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कोल्हापूर जिल्ह्यत पवारांचा कोठेही कार्यक्रम असला की आवर्जून हजेरी लावणाऱ्या माने या गावातीलच कार्यक्रमावर बहिष्कार टाकताना दिसल्या. एका अर्थाने त्यांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवल्याचे यातून उघड झाले. कार्यक्रमस्थळी तर त्यांचे कार्यकर्ते आमचा पक्षाच्या कार्यक्रमावरच यापुढे बहिष्कार असल्याचे पत्रकारांना सांगत राहिले.

भाजप- शिवसेनेची चाचपणी

शरद पवार यांनीही बेदखल केल्याने आधीच नाराज असलेला माने गट आता राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या निवेदिता माने यांनी अपक्ष, शिवसेना मार्गे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता हातावरील ‘घडय़ाळ’ काढून कमळ किंवा धनुष्यबाण हाती घेण्याच्या विचारापर्यंत हा गट आल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उघडपणे सांगितले जात आहे. माने यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी निकटचे संबंध पाहता ते भाजपात जाण्याची शक्यता आहे. पण, हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने पुन्हा खांद्यावर धनुष्यबाण घ्यायचे का, या पर्यायाचाही विचार सुरु आहे.