लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: श्री दत्त प्रभूची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीत येणाऱ्या वयस्कर भाविकांना श्री दत्त दर्शन घेणे आता सुलभ होणार आहे. मंदिराकडे जाणाऱ्या घाटावरील जुन्या दगडी पायऱ्यांची उंची एक ऐवजी अर्ध्या फुटाची करण्यात आली असून विजयादशमीपासून याचा वापर केला जाणार आहे.

साधारण १४३४ मध्ये दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आपल्या पादुका येथे ठेवून गाणगापूरला प्रयाण केले. त्यानंतर या मंदिराचा विकास होत गेला. त्यातील एक टप्पा म्हणजे ५७ पायऱ्यांचा समांतर घाट संत एकनाथांनी बांधला.

आणखी वाचा-रायगडात लाखभर लाडक्या बहिणींची आधार जोडणी अभावी कोंडी

दर्शनप्रक्रियेत पायऱ्यांना आणि घाटांना महत्त्व आहेच. हा धागा पकडून दत्त देवस्थानला पूर्वी दोन कोटींची मदत करणारे पुण्याचे उद्योजक विजय कुलकर्णी यांनी ७० लाख रुपये देणगीच्या रूपात पायरी बांधकामासाठी दिले. त्यातून पूर्वीच्या एक फूट उंचीच्या पायऱ्या आता अर्ध्या फुटाच्या करण्यात आल्या आहेत. पाय घसरू नये, यासाठी त्या छिन्नी मारून फुलवल्या आहेत. जुन्या पायऱ्यांच्या बरोबरीने नव्या पायऱ्यांचा वापर होणार आहे. आधारासाठी अद्ययावत ग्रील बसविण्यात येणार आहे.

वयस्कर भाविक, महिलांना दत्त दर्शन सुलभ होणार असून येत्या १२ ऑक्टोबर रोजी दसरा महोत्सव सोहळ्यादिवशी या नवीन बांधण्यात आलेल्या दगडी पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात होणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी, सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी सांगितले.

Story img Loader