राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आज सकाळी ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) पुन्हा छापा टाकला आहे. काल शुक्रवारी ईडीकडून मुश्रीफ यांच्या पुण्यातील मालमत्तेची चौकशी करण्यात आल्यावर लगोलग आज सकाळपासून त्यांच्या कागल येथील घरीही छापा टाकत चौकशी सुरू करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यात मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीने तिसऱ्यांदा छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात आर्थिक घोटाळय़ाचे आरोप सुरू केले आहेत. यापूर्वी त्यांची प्राप्तिकर, ईडी, सीबीआय, सहकार मंत्रालयाने चौकशी केली आहे. याशिवाय मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेचीही ‘ईडी’कडून चौकशी सुरू आहे.
काल उच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीवेळी मुश्रीफ यांना दिलासा मिळाला होता. तर तक्रारकर्ते किरीट सोमय्या यांच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तर,आज सकाळीच ईडीने पुन्हा हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा मारला आहे. सुमारे सात ते आठ अधिकारी निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी मुश्रीफ यांच्या घरात जाऊन महत्त्वाची कागदपत्रे हाती घेतली, तसेच कुटुंबीय यांच्याकडे चौकशीही सुरू केली आहे.
दरम्यान मुश्रीफ यांच्या घरावर कारवाई करताच मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न चालवला होता. स्थानिक पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानांनी रोखल्याने त्यांनी आंदोलन सुरू करीत ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी संवाद साधत, ‘तुम्ही सगळे शांत राहा. ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगा आम्हाला गोळय़ा घालून जा!’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
उशिरापर्यंत झाडाझडती
आमदार मुश्रीफ अधिवेशनासाठी मुंबई येथे आहेत. रात्री उशिरापर्यंत या पथकांकडून त्यांच्या घरी चौकशी सुरू होती. या चौकशीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. दरम्यान मुश्रीफ यांच्या पुण्यातील एका नातेवाइकांच्या निवासस्थानी तसेच एका कार्यालयातदेखील ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे. त्या वेळी ‘ईडी’च्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली असल्याचे समजते.