हद्दवाढीबाबत शासनाची द्विसदस्यीय समिती शुक्रवारपासून दोन दिवस जिल्ह्यच्या दौर्यावर येत असल्याने शुक्रवारी हद्दवाढीतील प्रस्तावित सर्व १८ गावांनी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले. सर्वच गावांमध्ये बंदला प्रतिसाद मिळाल्याने तेथील व्यवहार आज पूर्णत: ठप्प होते. तर, सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बठकीवेळी तिन्ही आमदारांसह नागरिकांनी हद्दवाढीविरूद्ध संतप्त भावना नोंदवल्या.
शासनाची द्विसदस्यीय समिती आज येणार असल्याने हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली १८ गावांमध्ये बंद पाळण्यात आला. आजच्या बंद मध्ये किराणा माल, व्यापारी, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, मार्बल मार्केट, चारचाकी वाहनांची शोरूम्स बंद राहिल्याने बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला .हद्दवाढीस विरोध दर्शविण्यासाठी बंदचे आवाहन केले होते. यासाठी ग्रामपंचायतीने गावात ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले होते. त्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.सकाळी मोटारसायकलवरून फेरी काढली, तसेच हद्दवाढविरोधात घोषणा दिल्या.
गांधीनगर, मुडिशगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगांव, शिरोली, नागांव, पाचगांव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालगे, उचगाव, कळंबा, वाडीपीर, वडणगे, शिये, िशगणापूर, नागदेववाडी, आंबेवाडी, शिरोली औद्योगिक वसाहत व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत या सर्व गावात व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. गावोगावी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढविरोधात बठका पार पडल्या. यामध्ये हद्दवाढविरोधी हद्दवाढीला विरोध असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. हद्दवाढीमुळे गावाचा विकास होणार नसून गावे भकास होणार आहेत, आमचा विकास करण्यासाठी आम्ही स्वयंपूर्ण आहोत, त्यामुळे जी हद्दवाढविरोधात लढाई सुरू आहे, ती जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
समितीसमोर प्रकटला विरोध
सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बठकीवेळी ग्रामीण भागातील विरोधाची प्रखरता दिसून आली. डझनभर वक्ते आणि डॉ. सुजित मिणचेकर , अंमल महाडिक , चंद्रदीप नरके या आमदारांनी हद्दवाढीमुळे ग्रामीण भागाचे कशाप्रकारे नुकसान होणार आहे, याचा पाढा वाचला . शहराचा विकास करता येत नसल्याने त्याचे अपयश पचवण्यासाठी हद्दवाढ करण्याचे ढोंग रचले आहे . महापालिकेतीतील गर व्यवहार, जमिनी लाटणे, पाकीट संस्कृती, विकास कामांचा बोजवारा आदी प्रकार उघड दिसत असताना महापालिका क्षेत्रात जाण्याचा वेडेपणा करणार नाही, शासनाने बळजोरी केल्यास जोरदार विरोध करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.