दयानंद लिपारे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर : राज्यात भाजपसोबत सत्ताकारण करण्याची कारणमीमांसा करण्यावर दिलेला भर वगळता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याने फारसे काही साध्य झाले नाही. कोल्हापूर शहर, जिल्ह्याचे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्यावर अवाक्षर काढले नाही. निवडणुकीच्या निमित्ताने हा दौरा असल्याचे सांगण्यात आले असताना याही बाबतीत त्यांनी कसलेही भाष्य केले नाही. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये १३ जूनला आले होते. महिना पूर्ण होत असतानाच ते पुन्हा करवीर नगरीत डेरेदाखल झाले. मागील दौऱ्याच्या वेळी त्यांनी राज्य शासनाची कार्यक्षमता, शासकीय योजनांची महती विशद करीत असतानाच ठाकरे सेनेवर हल्ला चढवला होता.
राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होऊन अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि पाठोपाठ अर्थ खात्याची जबाबदारी येणार असल्याच्या वार्तेनेच शिवसेनेच्या शिंदे गोटातील आमदारातील अस्वस्थता पुढे आली होती. खातेवाटप झाल्यावर सत्तेतील राष्ट्रवादीचे महत्त्वही अधोरेखित होऊ लागले होते. अशावेळी शिंदे गटाची राजकीय ताकद दाखवणे गरजेचे वाटत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील स्थानिक कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्याची सूचना केली. सभेच्या वेळेचे एकूण वातावरण पाहता आधीच्या भव्य सभेच्या तुलनेने यावेळची छोटेखानी सभा ठरली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने सक्तीने का असेना पण हजारो लाभार्थ्यांची गर्दी जमवली होती. कालच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेला काही हजाराचीही गर्दी होऊ शकली नाही. रिकाम्या खुच्र्या सभेचे वास्तव दर्शवणाऱ्या होत्या. पाऊस, शेतीची कामे, कोल्हापूर शहरात आषाढी यात्रेचे पेठापेठांमधील उत्साही वातावरण आणि सभेच्या नियोजनाची केवळ कागदावर केलेली तयारी यामुळे सभेचे एकूण वातावरणच निरुत्साही होते.
दिलासा ना शिवसैनिक, ना कोल्हापूरकरांना
निवडणुकीच्या तयारीसाठी शिंदे येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले असले तरी निवडणूक, पक्षबांधणी, पक्ष संघटनेचा आढावा अशा बाबींना शिंदे यांनी साधा स्पर्शही केला नाही. कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ, आयुक्त नियुक्ती, खंडपीठपासून अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्याबाबतीतही त्यांनी ठोस आश्वासन दिले नाही. मागील सभेत सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरसाठी भरघोस निधी दिल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे कोल्हापूरकरांना काही गवसेल ही अपेक्षाही व्यर्थ ठरली. राज्यपाल कोटय़ातून बारा आमदारांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना गळ घातली पण त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यातून ना शिवसैनिकांना काही गवसले, ना कोल्हापूरकरांना.
मुख्यमंत्र्यांचा एकूण भर राहिला तो उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यावर. मागील विधानसभा निवडणुकीनंतर युतीचे खरेखुरे समर्थक देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांना बेदखल ठरवले. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन महाविकास आघाडीशी सत्तासंगत करण्याची चूक केली. याच मुद्दय़ाला धरून शिंदे यांचे ठाकरेंवर टीकेचे वाग्बाण सोडले जात होते. बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी कधीही तडजोड करणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे सांगत असताना अजित पवार गटाबरोबर सत्तासोयरीक करावी लागल्याची खंत चेहऱ्यावर दिसत होती. भाषणामध्येही सलग, प्रवाही मुद्दा न मांडता त्यात विस्कळीतपणा होता.