कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओच्या जतन, सुशोभीकरणासाठी आवश्यक निधीचा मागणी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांना दिल्या आहेत.

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ या सिनेसृष्टीच्या वारशाला पुन्हा उभारी देण्याकरिता तसेच पूर्ववत पूर्ण क्षमतेने चित्रीकरण होण्यासाठी या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन, सुशोभिकरण आणि चित्रीकरणासाठी अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी रुपये निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. यावर शिंदे यांनी वरील सूचना महापालिका आयुक्त यांना दिल्या आहे.

१० कोटींची मागणी

जयप्रभा स्टुडिओ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आणखी दहा कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी करणार आहे. येत्या काळात कलेच्या या माहेरघरात कलाकारांचा आणि चित्रीकरणाचा ओघ पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.