कोल्हापूर : पंचगंगा सहकारी कारखान्याचे संचालक मंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाने बरखास्त केले असून, नव्याने निवडणूक घ्यायचे आदेश देण्यात आले आहेत. नव्याने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष वेधले आहे.हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा सहकारी बहुराज्य साखर कारखाना १८ वर्षांसाठी रेणुका शुगर्सला भाडेतत्वावर चालवण्यास दिला होता. आता तो विल्मर या कंपनीकडून चालवला जात आहे. कारखाना भाडेतत्वावर दिला असला तरी सत्तारूढ विरोधकांत राजकीय स्पर्धा गेली १५ वर्षे सुरूच आहे.
या कारखान्याची निवडणूक तीन महिन्यांपूर्वी झाली होती. अनेक उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने अवैध ठरवण्यात आले, असा तक्रार अर्ज विरोधी गटाच्या नेत्या रजनी मगदूम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला होता. त्याआधारे कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घ्यायचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे कारखान्याचे संस्थापक रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या, माजी अध्यक्षा रजनी मगदूम यांना दिलासा मिळाला असून, अध्यक्ष पी. एम. पाटील गटाला धक्का बसला आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे – २९ एप्रिलपासून अर्ज दाखल, ५ मे छाननी, ६ मे माघार, ११ मे मतदान, १२ मे मतमोजणी, १४ मे निकाल.