ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन विजेचा दाब वाढल्याने इचलकरंजी येथील कामगार चाळीत मंगळवारी सुमारे दोनशे ते अडीचशे टीव्ही संच, फ्रीज, वॉशिंग मशिन, मोबाइल संच तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. १५ दिवसांपासून सदरच्या ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या उडत असल्याने याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती. मात्र, वीज वितरण कंपनीने त्याची दखल न घेतल्याने ऐन दिवाळीत गलथान कारभाराचा नाहक फटका बसण्याबरोबरच त्यांचे दिवाळे निघाले.
नगरपालिका मालकीच्या दुकाळगाळय़ांच्या पिछाडीस कामगार चाळ आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक विजेच्या उच्चदाबामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये  बिघाड झाला. या वेळी विद्युतवाहिन्या निखळून पडल्याने ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या उडू लागल्या. विजेचा दाब अचानकपणे वाढल्याने चाळ परिसरातील सुमारे अडीचशे घरातील टीव्ही संच, फ्रीज, वॉिशग मशिन, मोबाइल संच तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली.
अचानक घडलेल्या या प्रकाराने नागरिकांनी भयभीत होऊन घराबाहेर धाव घेतली. या घटनेत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये वारंवार बिघाड होत असतो. गत १५ दिवसांपासून ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या पडत होत्या. त्याबाबत भागातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रारसुद्धा केली होती. मात्र या तक्रारीची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे ऐन दिवाळीत आíथक फटका बसला. सायंकाळी उशिरापर्यंत वीज मंडळाचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीच्या कामात मग्न होते. या नुकसानाची वीज मंडळाकडून भरपाई मिळावी, अशीही मागणी केली जात आहे.

Story img Loader