८ जूनला केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण
अवघ्या साडेतीन महिन्यापूर्वी कार्यान्वित झालेला कागल नगरपरिषदेचा घनकचऱ्यापासून वीज, खत निर्मिती प्रकल्प आता जागतिक मानांकनासाठी सज्ज झाला आहे. शहरातील पथ दिव्यांना टाकाऊ पासून टिकाऊ या संज्ञेप्रमाणे कचऱ्यापासून वीजनिर्मिती करुन पथ दिवे प्रकाशित करणारा महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल उल्लेखनीय बाब ठरली आहे. साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या जागतिक पातळीवरील मानांकनाचे सादरीकरण ८ जूनला केंद्रीय नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री, रिझव्र्ह बँकेचे उप गव्हर्नर यांच्यासमोर होणार आहे. सुयोग्य पध्दतीने घनकचऱ्याचे संकलन, प्रक्रिया, विघटन केल्याने कागल शहर शून्य कचरा संकल्पनेत राज्यात पहिले ठरले आहे. कागल नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती व खत निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत. कागल नगरपरिषदेचा हा उपक्रम महाराष्ट्रातील क वर्ग नगरपरिषदापकी स्वत:ची वीजनिर्मिती करणारी एकमेव नगरपालिका ठरली. मानांकनाच्या सादरीकरणासाठी पथक मुंबईस रवाना होणार असल्याचे मुख्याधिकारी प्रभाकर पत्की व आरोग्य अधिकारी नितिन कांबळे यांनी बुधवारी सांगितले.
कागल शहरामध्ये दररोज सुमारे ९ मेट्रीक टन कचरा गोळा होतो. त्यापकी ५ टन सुका व ४ टन ओला कचरा जमा होतो. या प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन आरोग्य अधिकारी नितिन कांबळे पाहत आहेत. वीजनिर्मिती- ओल्या कचऱ्याची पूर्ण विल्हेवाट लावण्यासाठी कागल नगरपरिषदेने मार्च २०१५ मध्ये वीज निर्मिती व खत निर्मिती प्रकल्प हाती घेतला. १६ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित झाला. या प्रकल्पापासून तयार होणारी अर्धा मेगॅवॅट वीज शहरातील २५० पथदिव्यांना पहिल्या टप्प्यात पुरविण्यात आली आहे. यापुढील टप्पा १ हजार ५०० पथदिव्यांना दररोज पुरविण्यात येणार आहे. यामुळे कागल शहरातील पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागेल. या प्रकल्पामुळे नगरपालिकेच्या वीज खर्चात मासिक किमान २ लाखाची बचत होणार आहे.
खतनिर्मिती देखील
ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रक्रियेतून निर्माण होणारे खत हे बाजारातील खतापेक्षा तिप्पट जादा नायट्रोजनयुक्त उत्तम दर्जाचे खत उपलब्ध होत आहे. हे खत विक्रीतून मासिक सरासरी १ लाख रुपयांचे कागल नगरपरिषदेस उत्पन्न मिळणार आहे. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन गांडूळ खतनिर्मिती होते. हे खत विक्रीतून मासिक सरासरी ५० हजार रुपयांचे कागल नगरपरिषदेस उत्पन्न मिळणार आहे. घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती व खतनिर्मिती प्रकल्प उभारणीस आमदार हसन मुश्रीफ, कागलचे नगरसेवक, नगरसेविका, शहरातील नागरिक यांच्या सहभागामुळे हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे पत्की यांनी सांगितले.