कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज कोल्हापुरात आगमन होत असताना त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेली कमान पोलीस, अतिक्रमण पथकाने काढून टाकली. सायबर चौक येथे ही कारवाई आज करण्यात आली. शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री हे सायंकाळी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांची तपोवन मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.
हेही वाचा >>> “शासन आपल्या दारी परी प्रवासी वाऱ्यावरी”; एसटी प्रवाशांचे कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन
या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाजवळ असलेल्या सायबर चौकामध्ये अशीच एक कमान उभारण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे होती. तथापि मुख्य मार्गावर असलेली ही कमान वाहतुकीला अडथळा करत होती. अवजड वाहने जाण्यामध्ये मर्यादा येत होत्या. ही तक्रार झाल्यानंतर महापालिका अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाने ही कमान तेथून काढून टाकण्याची कारवाई तात्काळ केली. त्यानंतर तेथून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत सुरु झाली.