गेले नऊ दिवस विविध व्रतवैकल्ये करून आदिशक्ती मातेची मंगलमय वातावरणात मनपूर्वक आराधना केल्यानंतर गुरूवारी विजयादशमीदिनी शक्तिदेवी मंडळांच्या सवाद्य मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. पार्क मैदानावर शमीच्या वृक्षाभोवती सीमोल्लंघन करण्यासाठी व सोन्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपटय़ांची पाने लुटण्यासाठी अबालवृध्दांची एकच गर्दी उसळली होती.
नवरात्र महोत्सवात शक्तिदेवीमातेची आराधना करण्यासाठी शहर व परिसरात भक्तीचा सागर लोटला होता. तुळजापूरच्या भवानीमातेचे प्रतिरुप समजल्या जाणाऱ्या श्री रुपाभवानी मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते गेले नऊ दिवस भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. याशिवाय उत्तर कसब्यातील कसबादेवी, गणेश पेठेतील भावसार समाजाची श्री हिंगुलांबिका देवी, मराठा वस्तीतील शिवगंगा देवी, भारतीय चौकातील भवानीमाता, शुक्रवार पेठेतील शिवलाड समाजाची अंबाबाई तसेच कालिका देवी, निलगार इस्टेट येथील कालीमाता आदी ठिकाणी झालेल्या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता.
गणेशोत्सवाच्या तुलनेने नवरात्रौत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याची सोलापूरची पूर्वापार परंपरा आहे. यंदा शहरात यंदाच्या वर्षी ४३२ सार्वजनिक शक्तिदेवी मंडळांनी ‘श्री’ ची प्रतिष्ठापना केली होती. अनेक मंडळांनी आकर्षक रोषणाई आणि सजावटीचे देखावे सादर करून नवरात्र महोत्सवाची आगळी-वेगळी परंपरा कायम ठेवली होती. महाअष्टमी व महानवमीला विविध ठिकाणी होमहवनाचे विधी पार पडले. विविध मंडळांनी सजावटीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.
गुरूवारी सायंकाळी विजयादशमीनिमित्त मंगळवार पेठ पोलीस चौकी येथून निघालेल्या नवरात्र महोत्सवाच्या सांगता मिरवणुकीतील अग्रभागी बलिदान चौकातील जयभवानी नवरात्र उत्सव शक्तिपूजा मंडळाच्या शक्तिदेवीची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या मिरवणुकीत श्री हिंगुलांबिका देवीची पालखी व छबिना, शिवलाड समाजाचा नंदीध्वज, इंद्रभवानी मातेची पालखी व नंदीध्वजाचा सहभाग वैशिष्टय़पूर्ण ठरले होते. मिरवणुकीत आझाद हिंद नवरात्र महोत्सव मंडळाचा आकर्षक रोषणाई केलेला रथ मिरवणुकीची शोभा वाढविणारा ठरला. जयभवानी मंडळ व भवानी पेठेतील जागृती नवरात्र मंडळाचा लेझीम ताफा शिस्तबध्द व तेवढाच भव्य स्वरुपाचा होता. सुदर्शन नवरात्र महोत्सव मंडळ, शुभमंगल नवरात्र उत्सव मंडळ, आकाशगंगा मंडळ, ओमशक्ती पूजा मंडळ, जेमिनी मंडळ, जय जगदंबा मंडळ, बुरुड समाज मंडळ, विजयालक्ष्मी मंडळ, संत हरळय्या मंडळ आदी विविध मंडळांच्या पुढे लेझीम ताफ्यात तरुण बेधुंद होऊन खेळ करीत होते. या मिरवणुकीत सुमारे १६ मंडळे सहभागी झाली होती. मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, सिध्देश्वर पंचकट्टा, सिध्देश्वर मंदिरमार्गे ही मिरवणूक रात्री पार्क मैदानावर पोहोचली. त्या ठिकाणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तिपूजा सुसूत्रता मंडळाच्यावतीने मिरवणुकीतील सर्व मंडळांचे स्वागत करण्यातआले. यंदा नवरात्रौत्सवाबरोबर मोहरम उत्सव एकत्र आल्याच्या पाश्र्वभूमीवर नवरात्र महोत्सवाच्या सांगता मिरवणुकीच्या वेळी शहरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दसरा सणामुळे मोहरम समितीने सवारींच्या मिरवणुका स्थगित केल्या होत्या. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या अधिपत्याखाली शीघ्र कृतिदलासह मिरवणूक मार्गावर तसेच आसपासच्या गल्लीबोळातही पोलीस नेमण्यात आले होते.गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रौत्सवातही डॉल्बीलाफाटा देण्यातआला होता.
विजयादशमीनिमित्त सायंकाळी पार्क मैदानाला सीमोल्लंघनासाठी जत्रेचे स्वरुप आले होते. ‘आई राजा उदो उदो’ च्या गगनभेदी घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला होता. तेथील शमीच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून सोने लुटण्यात आले. सीमोल्लंघनानंतर सद्भावनेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपटय़ांची पाने एकमेकांना देऊन नागरिक शुभेच्छा देत होते. विजयादशमीनिमित्त झेंडूंच्या फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली होती. फुलांचे दर ४०  रूपयांपर्यंत होते. दुपारनंतर या दरात निम्म्याहून अधिक घट झाली. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरीवर्ग नाखुष होता.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या विजयादशमीनिमित्त वाहने, दूरचित्रवाणी संच, फ्रीज, मोबाईल संच, संसारोपयोगी वस्तू यासह सोने, चांदी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. विजयादशमीदिनी सोन्याचा भाव १० ग्रॅमला २७ हजार रुपये एवढा तर चांदीचा प्रतिकिलो दर ३७ हजारांच्या घरात होता. सोने-चांदीच्या दरातील चढउताराच्या पाश्र्वभूमीवर व्यापारी व पगारदार मध्यमवर्गीयांनी सोने-चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने सराफ बाजारात दिवसभर चांगली उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader