विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी करवीरनगरी सज्ज झाली असून श्रींच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. कोणत्या रुपातील विघ्नहर्त्यांला घरी विराजमान करावयाचे याचा विचार करीत साहित्यांच्या खरेदीसाठी गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. बाप्पांच्या स्वागतासाठी सजावटीच्या वैविध्यपूर्ण शोभेच्या वस्तूंनी बाजारपेठेत गर्दी झाली होती. तर, मंडळाचे कार्यकत्रे मंडप सजावटीत दंग झाले होते. यंदाच्या गणेशोत्सवावर जय मल्हार, बाहुबली, सेल्फी काढणारा गणेश, शिवरुपी, मूषकारुढ, मोरावरचा गणपती अशा मूर्तीची छाप असून याच मूर्तीना मागणी अधिक आहे.
पावसाने दिलेली ओढ, ऊस बिले मिळण्यास होणारा विलंब यामुळे आíथक चणचण भासत असली, तरी बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साह ओसंडून वाहत आहे. तर कार्यकर्त्यांना वर्गणी गोळा करताना नाकीनऊ येताना दिसत आहे. श्री गणरायाचे आगमन उद्या (गुरुवारी) होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देखाव्याची तयारी सुरू होणार आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील बाजारपेठाही सजल्या आहेत. शहरातील सर्वच कुंभार गल्ल्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. आवडलेली मूर्ती बुकिंगसाठी स्टॉल्सवर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. शहरातील विविध ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीसाठी मंडप उभारण्यात आले असून याठिकाणी घरगुती गणपतीपासून मोठय़ा सार्वजनिक गणपतीपर्यंत सर्व प्रकारच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सजावटीसाठी साहित्यांच्या खरेदीमध्ये प्रथम मखरांची खरेदी केली जाते. यामध्ये तिरुपती बालाजी, सोमनाथ मंदिर, शिवमंदिर, झुला मंदिर, मदुराई मंदिरांचे मखर बाजारात उपलब्ध आहेत. तसेच, थर्माकोल आणि लाकडी आसने उपलब्ध आहेत. लाकडी आसनांना वेल्वेट व लाईटच्या माळा लावून आकर्षक करण्यात आले आहे. त्यानंतर बाप्पाच्या मंदिराची आरास करण्यासाठी रंगीत पडदे, बॉल्स, झुंबर, पताका असे अनेक साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. सामाजिक एकोप्याचे आणि उत्साहाचे भरते आणणाऱ्या गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर उत्सुकतेलाही भरते आले आहे. प्रथेप्रमाणे मंगलमूर्तीचा कृपाशीर्वाद कायम आपल्यावर राहावा म्हणून लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण या मंगलदेवतेची अगदी आतूरतेने वाट पहात असतात. ती प्रतीक्षा गुरुवारी संपत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा