प्रगतीच्या मार्गावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करावे. औद्योगिक उत्पादने ग्रामीण भागात तयार व्हावीत. प्रत्येक घरातील तरुणांना, महिलांना यातून रोजगार मिळाला तर शहराची सूज-खेडी बकाल हे चित्र बदलेल. खेडी समृद्ध होतील व शहरातील ताण कमी होईल, असे प्रतिपादन कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी केले.
कोल्हापूर येथे ‘इंडस्ट्रिया २०१५’ या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील जिमखाना ग्राऊंडवर सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन अदृश्य काड सिद्धेश्वर महाराज यांचे हस्ते झाले. या वेळी राष्ट्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अधिकारी राजीव गुद्रे म्हणाले, की केंद्राकडून मध्यम व लघु उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानासह अनेक योजना आहेत. त्याचा तरुण उद्योजकांनी लाभ घ्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक प्रयोगशील आहेत. राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारासाठी अनेक जण पात्रही आहेत, पण गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरातून प्रस्ताव येत नाहीत. येथील उद्योजकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रवक्ते विनय सहस्रबुद्धे म्हणाले, अशा प्रकारच्या प्रदर्शनातून नवनिर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होते. प्रदर्शने प्रगतीसाठी प्रेरक ठरतात.
स्मॅकचे अध्यक्ष व चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र कोल्हापुरात कायमस्वरूपी व्हावे, यासाठी प्रयत्नशील असून, महाराष्ट्रात अशा प्रकारच्या चार केंद्रांना मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक आनंद माने यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा