शनिशिंगणापूरपाठोपाठ श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यातही महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. यानुसार आज ७ महिलांनी गाभा-यात प्रवेश केला. या प्रश्नी आंदोलन करणा-या आणि त्यांना विरोध करणा-या दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींसह प्रशासन आणि श्रीपूजक यांच्या दरम्यान आज झालेल्या बैठकीनंतर प्रतिकात्मक रूपात आज महिलांनी प्रवेश केला.
शनिशिंगणापूरपाठोपाठ कोल्हापूर येथेही मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश द्यावा या मागणीसाठी गेले काही दिवस आंदोलन सुरू होते. याबाबत आज सर्वपक्षीय संघटना, श्रीपूजक, आंदोलक आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात एका बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यानुसार सायंकाळी प्रतीकात्मक स्वरूपात स्त्री-पुरुष समानता संघटनेच्या ५ व हिंदुत्ववादी संघटनेच्या २ महिलांना गाभा-यात प्रवेश देण्यास मान्यता दिली. या ७ महिलांनी पितळी उंबरा ओलांडून महालक्ष्मीची ओटी भरल्यावर या वादावर पडदा पडला.
दरम्यान या प्रवेशापूर्वी झालेल्या बैठकीत दोन्ही बाजू हातघाईवर आल्याने खूप गोंधळ उडाला होता. प्रवेशाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवण्याचा हा खटाटोप असल्याचा आरोप या वेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा