कोल्हापूर : संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जात आहे. कोल्हापुरात ७८ कुटुंबांचे स्थलांतर केले असून ग्रामीण भागातही गती आली आहे.
कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल परिसरातील विटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. पुराचे पाणी आलेल्या तावडे हॉटेल, मार्केट यार्ड, मुक्त सैनिक वसाहत, सुतारवाडा या परिसराची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज पाहणी केली. दरम्यान, ग्रामीण भागात कुटुंबांचे स्थलांतर केले जात आहे. पन्हाळा तालुक्यातील आवर्डे येथे दोन कुटुंबांतील १८ लोकांनी नातेवाईकांच्या घरी स्थलांतर केले आहे. पुराचा धोका असलेल्या चिखली गावातील १० कुटुंबांनी पर्यायी ठिकाणी स्थलांतर केलेले आहे.
हेही वाचा – कोल्हापुरात पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली
हेही वाचा – माकडाच्या हल्ल्यात कोल्हापुरात विद्यार्थी जखमी
पडझड वाढली
पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. एक कच्चे घर पूर्णतः पडले आहे. १३ पक्की घरे तर ३७ कच्ची घरे अंशतः पडलेली आहेत. बाधित गोट्यांची संख्या तीन आहे. खाजगी व सार्वजनिक अशा मालमत्तेचे नुकसान झालेली एकूण संख्या ५२ आहे.