शिरोली औद्योगिक वसाहतीला प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. डी. चव्हाण यांनी स्मॅक पदाधिकाऱ्यांना दिले. त्यांनी स्मॅकला प्रथमच भेट दिली असता ते बोलत होते. त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता एस. एस. वराळे उपस्थित होते. अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी स्वागत केले.
औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी ए. डी. चव्हाण यांची नेमणूक झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शिरोली एमआयडीसीला भेट दिली.
या वेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, संचालक अतुल पाटील, जयदीप चौगुले, दीपक परांडेकर, रामराजे बदाले, सी. पी. सोहनी यांनी एमआयडीसी परिसरातील समस्यांचा पाढा वाचला. यामध्ये सध्या पावसाळा तोंडावर आला आहे, एमआयडीसीमधील तत्काळ नालेसफाई करून घ्यावी, एमआयडीसीत कुठेही पक्की ड्रेनेजलाईन नाही, सिमेंट काँक्रीटची पक्की ड्रेनेजलाईन बांधावी. स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीचा आहे. जागोजागी कचरा कोंडाळे भरले आहेत, त्यामुळे दरुगधी पसरते. स्मॅकने आयटीआय संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना तत्काळ नोकरी उपलब्ध करून दिली जाते; पण सध्या संस्थेकडे आयटीआयसाठी जागा अपुरी पडते. आयटीआयसाठी औद्योगिक महामंडळाने पाच एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या उद्योजकांनी चव्हाण यांच्याकडे केल्या.
चव्हाण यांनी, औद्योगिक वसाहतीच्या आणि उद्योजकांच्या समस्या सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोतच. पावसाळा सुरू होण्याअगोदरच नालेसफाई करून घेतली जाईल. महामंडळाकडे पक्क्या ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव पाठवून निधी उपलब्ध करून घेऊ. कार्यकारी अभियंता वराळे यांनी एमआयडीसीमधील अतिक्रमणे हटविण्यात येतील, कचरा उठावही केला जाईल आणि आयटीआयच्या जागेसाठी महामंडळाकडे प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा