कोल्हापूर : दूध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र पांडुरंग आपटे (वय ७१ ) यांचे निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एमएस्सी ॲग्रीचे शिक्षण त्यांनी घेतले होते. पदव्युत्तर शिक्षणात सुवर्णपदक पटकावणाऱ्या आपटे यांना विदेशामध्ये नोकरीची संधी असतानाही त्यांनी आपल्या आजरा तालुक्यातील शेतीमध्ये लक्ष घातले. तेथे पहिल्यांदा संकरित गाई आणल्या. १९८६ पासून सलग ३५ वर्षे ते गोकुळचे संचालक आणि तीन वेळा अध्यक्ष होते. महानंदचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. गेली चार वर्षे ते कर्करोगाने आजारी होते. आजरा तालुक्यातील जनता दूध संस्था, कोल्हापूर येथील ट्रान्सपोर्ट या संस्थांचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात महालक्ष्मी बँकेच्या माजी अध्यक्षा, संचालिका पद्मजा आपटे यांच्यासह दोन मुले, सून, भाऊ सुधीर आपटे असा परिवार आहे.

Story img Loader