कोल्हापूर : भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी भूमिका बदलली नाही. शक्तिपीठ महामार्गाला माझा विरोधच राहील, असे स्पष्टीकरण भाजपत प्रवेश केलेले माजी आमदार संजय घाटगे यांनी शुक्रवारी येथे केले.उद्धव ठाकरे शिवसेनेतून संजय घाटगे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला. घाटगे यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात विविध आंदोलनांमध्ये भाग घेत आपली टोकदार भूमिका व्यक्त केली होती.
शक्तिपीठ प्रकल्पासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने आंदोलनाचे समन्वयक गिरीश फोंडे यांना निलंबित केल्याने या विरोधात काल कोल्हापूर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्याकडे घाटगे यांनी पाठ फिरवल्याने त्यांनी शक्तिपीठ प्रकल्पाबाबतची भूमिका बदलली, अशी टीका होऊ लागली होती.
या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता घाटगे म्हणाले, माझी भूमिका कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात माळरानावरील जमिनी शेतकऱ्यांच्या चार पिढ्या खर्च केल्यानंतर आता पिकाऊ झाल्या आहेत. जमिनीचे सपाटीकरण, सिंचन योजना, जलवाहिन्या यासाठी शेतकऱ्यांच्या गेल्या चार पिढ्यांना कष्ट उपसावे लागल्याने आता कोठे त्यांना सुखाचे चार घास मिळू लागले आहेत. अशा वेळी येथे शक्तिपीठ प्रकल्प होणार असेल, तर त्यास विरोध राहील. कागल तालुक्यात हा प्रकल्प होऊ देणार नाही.