कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार, राज्याची प्रगती, व महायुती बळकट करणे या त्रिसूत्रीच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचे आहे, असे मत नूतन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हसन मुश्रीफ यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आज येथील पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार राजेश पाटील, भैय्या माने, आदिल फरास, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अनिल साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांच्यावर टीका नको
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली असता ते एकाकी पडू नयेत म्हणून साथ देण्याचा निर्णय एकूण ४७ आमदार, हजारो कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतरही अजित पवार यांनी शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत, दैवत आहेत अशा व्यक्त केलेल्या भावनांचा मीही त्याचाच पुनरुच्चार करीत आहे. आपल्याला एकजूट राहून पक्ष बळकट करायचा आहे. हे करीत असताना दुसऱ्या गटावर टीका करू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
ईडीचे प्रकरण अलीकडचे यावेळी काही कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईला घाबरून हा निर्णय घेतला का असा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचा संदर्भ घेवून मुश्रीफ म्हणाले, याआधी २०१४, २०१७, २०१९ या कालावधीत भाजपसोबत पाण्याची भूमिका घेतली होती. तेव्हा ईडीच्या कारवाईचा मुद्दाच नव्हता. अलीकडे तो सुरू झाला असला तरी न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांच्याकडून योग्य तो निर्णय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.