शेतकऱ्यांच्या फळबागांसाठी एक्सपोर्ट झोन निर्माण करून त्यासाठीच्या सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तसेच शेतकऱ्यांनी किमान १० टक्के क्षेत्रावर फळबाग लागवड कार्यक्रम हाती घ्यावा, यासाठी शासनस्तरावरून आवश्यक त्या सवलती उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी येथे केले.
जिल्ह्यातील महसूल, कृषी आदी विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी गोकुळ शिरगाव येथील गोशिमाच्या सभागृहात आयोजित केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बठकीत महसूलमंत्री एकनाथ खडसे बोलत होते. शेतकऱ्यांच्या बांधावर फळबाग लागवड हा उपक्रम मनरेगाच्या माध्यमातून राबवला जाईल, असे सांगून खडसे म्हणाले, राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० टक्के अनुदानावर फळबागांचा भरीव कार्यक्रम मनरेगाच्या माध्यमातून हाती घेतला जाईल. याबरोबरच तेलबिया आणि डाळीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाईल, तसेच ठिबक व तुषार सिंचन हे उपक्रमही प्रभावीपणे राबवून उपलब्ध पाण्यावर अधिकाधिक शेती उत्पन्न घेण्याचा शासनाचा मानस असल्याचेही ते म्हणाले.

Story img Loader