कोल्हापूर : शेतकरी चळवळीनेच मला दोन वेळा आमदारकी व मंत्रीपद मिळाले असले तरी शेतकरी चळवळीत राहूनच शेतकरी प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न मी करीत असतो. राजकारणाच्या नादात मी चळवळीला कधीच वळचणीला बांधणार नाही, अशी ग्वाही माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. याचवेळी त्यांनी संघटना ही एक सामुदायिक ताकद असते. आपली संपत्ती व आपली ताकद ही रयत क्रांती संघटनाच आहे, असे मानून प्रत्येकाने काम केले पाहिजे, अशापेक्षा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रयत क्रांती संघटनेची विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे येथे झाली. या बैठकीमध्ये नूतन राज्याची कार्यकारणी तयार करण्याची तयार करण्यात आली. रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सागर खोत(सांगली), रयत क्रांती संघटनेचे पक्ष प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील(सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर नूतन राज्य कार्यकारणी मध्ये राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले(सोलापूर) राज्य कोअर कमिटी अध्यक्ष प्रा. एन.डी. चौगुले(सांगली) महिला प्रदेशाध्यक्ष ललिता लोलगे( कोल्हापूर) युवा महिला प्रदेशाध्यक्ष प्रियाताई लोडम तसेच सर्व विभागाच्या नियुक्ती करण्यात आल्या.

यावेळी खोत म्हणाले, राज्यामध्ये शेतकऱ्यांची चळवळ ही रयत क्रांती संघटना पुढे घेऊन जाऊ शकते. रयत क्रांती संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारी संघटना आहे, म्हणून रयत क्रांती संघटनेचे शेतकऱ्यांच्या चळवळीतील योगदान हे खूप मोठे आहे. मी सकारात्मकतेला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. माझ्या आयुष्यात नकारात्मकतेला कधीच थारा मी देत नाही. साधनसामग्री देऊन चळवळी चालत नसतात, तर सामान्यांच्या प्रश्नावर कार्यकर्त्याने काम करावे लागते. ज्या ज्या वेळी कार्यकर्त्याला पदे मिळतात त्यांना शिंगे फुटतात. जो कार्यकर्ता साधन निर्माण करतो तोच खरा कार्यकर्ता असतो. लढाऊ कार्यकर्ताच शेतकरी चळवळीत काम करण्यास बांधील असतो. यावेळी नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यातील संघटनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांच्या आठवणींचाही मागोवा घेतला. संघटनेत काम करणारा कार्यकर्ता हा प्रामाणिक व स्वाभिमानी असतो. तो आपले मत कधीही गहाण ठेवत नाही. व शेतकरी प्रश्नावर तो तत्परतेने प्रशासनाला धारेवर धरण्यास मागेपुढे पाहत नाही.

रयत क्रांती संघटनेने ऊस उत्पादक, दूध उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना जी वीज बिल माफी, पीक विमा, दुष्काळ निधी, दुधाला अनुदान मिळत आहे त्यात रयत क्रांती संघटनेचा सिंहाचा वाटा आहे. करोनाच्या काळात आंदोलने करता येतात, हे फक्त रयत क्रांती संघटनेनेच संपूर्ण देशाला दाखवून दिले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना खोत पुढे म्हणाले, तुमच्यात हिंमत अशी असली पाहिजे की, समोरच्याची चूक आहे, हे चूकच म्हणून त्याला अंगावर घेतले पाहिजे. चुकीचे समर्थन कधीच करायचे नाही. म्हणूनच मी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात नामदेव शास्त्री यांनी चुकीचे समर्थन केले. यावेळी मी रोखठोक टिपणी केली.

शेतकरी चळवळीत काम करताना चाकण येथील धरणग्रस्तांचा प्रश्न रयत क्रांती संघटनेने हाती घेऊन तडीस लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कार्यकर्त्यांचे फोन घेण्यास मी कधीही कमीपणा मानत नाही. रात्री अहोरात्री मी फोन घेत असतो. हळदीच्या गाडीची जप्ती पोलिसांनी केली त्यावेळेस पोलीस स्टेशनवर जाऊन आंदोलन केलं. कांद्याचा टेम्पो पुणे पोलिसांनी जप्त केला, त्यावेळी पुण्यात महानगरपालिकेच्या कार्यालयावर आंदोलन केलं. तसेच शेतकरी आपला शेतमाल जेव्हा बाजारात घेऊन जातो तेव्हा वाहतूक करताना ट्रॅफिक पोलीस त्रास देतात. त्या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मी स्वतः निवेदन देऊन, शेतकरी मालाच्या वाहनांना त्रास देऊ नये याबाबतही मी पाठपुरावा केलेला आहे.

सदाभाऊंचा कार्यकर्ता हा प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात कार्यकर्ता आहे, याची आठवण मला भेटल्यावर राज्यातील अनेक मंत्री करून देतात, त्यावेळी मला माझ्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो.

निवडणुका लढवण्याचा निर्धार

शरद जोशी हे प्रचंड विद्वान व्यक्ती होते. ते चालते बोलते कृषी विद्यापीठ होते. देशाचे कृषितज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अशा शेतकरी नेत्याच्या मुशीतच माझी जडणघडण झालेली आहे आणि म्हणूनच रयत क्रांती संघटना ही महाराष्ट्रात शेतकरी चळवळीत काम करणारी संघटना म्हणून या आठ वर्षात नावारुपाला आलेली आहे. सध्या राज्यामध्ये प्रचंड राजकीय व शेतकरी पोकळी निर्माण झाली आहे. सगळ्या चळवळी थंड झाल्या आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचा निर्धार आज आपण नूतन राज्य कार्यकारिणी तयार करत असताना सर्वांनी मिळून करूयात आणि इथून पुढे येत्या सहा महिन्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून शेतकरी प्रश्नावर, आपापल्या भागात आंदोलने करून त्यांचे प्रश्न मार्गी लागून आपली पात्रता सिद्ध करावी. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रयत क्रांती संघटना लढविणार हा निर्धार आजच्या राज्य कार्यकारणी प्रसंगी करूया,असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचे विचार ऐकताना मी त्यांच्यामध्ये जाऊन बसलो. काम करताना आलेल्या समस्या, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या मागण्या यांचे टिपण तयार केले आणि त्याचे सविस्तर विश्लेषण खोत यांनी त्यांच्या समारोपाच्या भाषणात केले.

कार्यकर्त्यांचा संघटनेत प्रवेश

या राज्य कार्यकारिणीच्या निवडीमध्ये रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून अरविंद पाटील(वाशिम), पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष अमोल वेदपाठक(सोलापूर), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गजानन दांडेकर (पुणे), मराठवाडा विभाग अध्यक्ष शिवाजी पेठ (लातूर) मराठवाडा विभाग युवा अध्यक्ष गजानन राजबिंडे (जालना), विदर्भ अध्यक्ष ॲड. आशिष वानखेडे, उत्तर महाराष्ट्र वाल्मीक सांगळे (नाशिक) यांच्याही नियुक्त करण्यात आल्या. तसेच माझे जुने सहकारी काही कारणास्तव ते इकडे तिकडे गेले होते परंतु ते बिनीचे कार्यकर्ते असल्याकारणाने ते पुन्हा आपल्या संघटनेकडे परतले, असे भानुदास शिंदे आणि राहुल मोरे यांनी पुन्हा रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रम संपल्यानंतर सहकाऱ्यांसोबतच सदाभाऊ खोत यांनी पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला.