इचलकरंजी येथील नदीवेस नाका लक्ष्मी मंदिर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून बनावट विदेशी दारू निर्मिती करणारा कारखाना उघडकीस आणला. या प्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली असून एकजण फरारी झाला आहे. तर कारवाईत टेम्पोसह ७ लाख ८६ हजार ७७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नदीवेस नाका परिसरातील लक्ष्मी मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे बनावट विदेशी मद्य तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक संजय पाटील, गावभागचे पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, शिवाजीनगरचे सर्जेराव गायकवाड व पथकाने वरील ठिकाणी छापा मारला. त्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की ५०० लिटर, २०० लिटरचे दोन बॅरेल, २० लिटरचे चार जार, २० लिटरचे तीन कॅन आणि १८० मिलीच्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या ७२० रिकाम्या बाटल्या आणि ७५० मिलीच्या १५० काचेच्या रिकाम्या बाटल्यांसह अल्को मीटर, बॅगपायपर व्हिस्कीचे टोपणे आणि लेबल्स् आदी ४ लाख ८६ हजार ७७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी विकी उर्फ विक्रम दशरथ काटे (वय २२ रा. नदीवेस), अनिल निवृत्ती येजरे (वय २३ रा. शेळके मळा), चंद्रकांत मनोहर काकडे (वय ४८ रा. कागवाडे मळा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर उत्तम खराडे व अन्य फरारी झाले आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक ए. व्ही. घाटगे, डी. बी. कोळी, संभाजी कोळे, सचिन भवड, नितीन िशदे, राजेंद्र दिवसे, सहा. दुय्यम निरीक्षक एस. एल. मांजरे यांच्या पथकाने केली.

Story img Loader