जागतिकीकरणाच्या रेटय़ात आजचा शेतकरी स्वत:ची सामाजिक, सांस्कृतिक ओळख गमावून बसला आहे. उत्पादक असणारा तोच स्वत: एक मोठा ग्राहक बनून बसलेला आहे. त्याची ओळख परत मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आज प्रसारमाध्यमांवर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुधीर भोंगळे (पुणे) यांनी मंगळवारी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचे एम.ए.मास कम्युनिकेशन आणि वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शेतकऱ्यांची आत्महत्या आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे बीजभाषक म्हणून ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील अध्यक्षस्थानी होते. वारणा महाविद्यालयाचे प्रताप पाटील, कोल्हापूर प्रेस क्लबचे सतीश घाडगे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. भोंगळे म्हणाले, शेतीमालाचे भाव पडणे, शेतीमालास सामाजिक सुरक्षितता नसणे आणि परदेशी धोरणे हीसुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील कारणे आहेत, तसेच व्यसनाधीनताही काही प्रमाणात कारणीभूत आहे. आत्महत्येच्या कारणांचा शोध व वेध घेणे माध्यमांचे कर्तव्य आहे. परंतु, माध्यमे विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमे त्या कारणांच्या मुळाशी जात नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अभ्यासपूर्वक या घटनांकडे पाहिले पाहिजे, त्यांची दखल घेतली पाहिजे. पत्रकारांमधील अभ्यासूवृत्ती, संशोधनवृत्ती जागृत राहणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याने माध्यमांनी काढलेल्या निष्कर्षांवर विश्वास ठेवणे कठीण होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, ग्लोबल वॉìमगमुळे हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. साहजिकच मान्सूनही त्याला अपवाद नाही. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त प्रतिकूल परिणाम करणारी अनिश्चितता या देशातील शेतीमध्ये निर्माण झालेली आहे. शेतीची प्रगती झाली, हरितक्रांती झाली, पतव्यवस्था चांगली झाली, असे होऊनही शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढतेच आहे, हे चिंताजनक आहे.
डॉ. निशा पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शीतल माने यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा