कोल्हापूर :कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. राज्य शासनाच्या वतीने महावितरण मार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजने अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सव्वा लाख कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीजेची सोय होणार आहे. हि माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.
शेतीला दिवसा, अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचा वीज भार असणाऱ्या वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे. गायरान, नापीक व पडिक जमिनीवर विकेंद्रीत सौरप्रकल्प उभारणी करण्यात येणार आहेत.शासकीय जमीन नाममात्र एक रुपया या दराने भाडेपट्टा व पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्प कार्यान्वित झाला असेल अशा ग्रामपंचयातींना लक्ष प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत प्रति वर्षी ५ लाख प्रमाणे ३ वर्षासाठी देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> गोकुळची सभा वादळी होण्याची चिन्हे; सभेआधी पोस्टर युद्ध रंगले
कोल्हापुरात ६५ हजार शेतकरी
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ उपकेंद्रांच्या ठिकाणी ७९५ एकर जमिनीवर १५९ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याव्दारे अंदाजे ६५ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे.
सांगलीत ५९ हजार लाभार्थी
सांगली जिल्ह्यातील २८ उपकेंद्रांच्या ठिकाणी ११५३ एकर जमिनीवर १८६ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार असून अंदाजे ५९ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे.