लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : टोमॅटोने किरकोळ विक्री बाजारात दराचे अर्धशतक ओलांडले असल्याने ग्राहक हिरमुसले असले तरी टोमॅटो उत्पादकांच्या गालावर लाली पसरली आहे. काही दिवसांपूर्वी दर घसरल्याने टोमॅटो फेकून द्यावा लागला होता पण आता दर वधारल्याने टोमॅटोने शेतकर्‍यांना चांगलाच अर्थिक हातभार लावला आहे.

शिरोळ तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यानी टोमॅटोचे पिक घेतले आहे. सध्या फळ तोडणीस आले असतानाच पावसाची कमतरता व कडक उन्हामुळे झाडाची वाढ कमी झाली आहे. उत्पादन कमी प्रमाणात निघत आहे. शेतातून एकरी एका दिवसाआड २०० ते २५० कॅरेट इतका निघणारा टोमॅटो १०० ते १५० कॅरेट इतकाच उत्पादित होत आहे. उत्पादन घटल्याने बाजारपेठेत सरासरी मागणी पेक्षा टोमॅटोचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे.

आणखी वाचा-नोकरीचे नियुक्ती पत्र अन् पित्याचे निधन; भावी शिक्षकाने अनुभवले घटकेत दोन टोकाचे प्रसंग

सध्या एका कॅरेटला सरासरी ७०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे. एका कॅरेटमध्ये पंचवीस किलो टोमॅटो असतात. यानुसार बाजारात किरकोळ विक्री ५० ते ७० रुपयापर्यंत होत असली तरी शेतकर्‍याला प्रति किलो ३५ ते ४० रुपयापर्यंत भाव मिळतो आहे. बाजारपेठेत टोमॅटोचा दर तेजीत आल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्‍याला चांगला आर्थिक हातभार लागला आहे.

भाजीपाला पिकवण्यात जिल्ह्यात अग्रस्थानी असलेल्या शिरोळ तालुक्यातील टोमॅटो घटप्रभा, मुंबई, अहमदाबाद, कोलार, संगमनेर, बेंगलोर, गुजरात आदी ठिकाणच्या बाजारपेठेत पाठवला जातो. काही शेतकरी स्वखर्चाने तर काही शेतकरी कृषी माल बाजारपेठेत पाठवतात. काही ठिकाणी दलाल स्वतः शेतात येऊन खरेदी करतात. याविषयी अकिवाटचे टोमॅटो उत्पादक शेतकरी कृष्णात विठ्ठल हुजरे म्हणाले, टोमॅटोचे पीक हे साधारण ९० ते ११० दिवसाचे असते.मे महिन्यात पावसाने चांगली साथ दिल्याने टोमॅटोचे पिक चांगले आले आहे. मात्र जुन महिन्यात गेली दोन तीन आठवडे पावसाने दडी मारली असल्याने उत्पादन निम्म्या प्रमाणात घटले आहे.

आणखी वाचा-कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचा व्यवसाय ५ हजार कोटीवर नेण्याचे उद्दिष्ट – स्वप्निल आवाडे

उत्पादन खर्च व उत्पन्न याचे गणित उलगडताना हुजरे यांनी सांगितले की, टोमॅटो पिकाला तीन-साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये शेती मशागत,रोपे,औषध फवारणी,खत,मजुर खर्च असा एकरी दोन ते तीन लाख रुपये खर्च आला आहे. बाजारपेठेत दर चांगला मिळाल्याने सरासरी यातुन पाच ते सहा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. असाच अनुभव अन्य टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. एकुणच यावर्षी टोमॅटोने उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहऱ्यावर लालिमा आणली आहे.