लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : पंचगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतातील पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शिरढोण येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना कोंडले. तणाव निर्माण झाल्याने कुरुंदवाड पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला होता.

पंचगंगा नदीपात्रात गुरुवारपासून पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पिकांना फटका बसत आहे. पाटबंधारे विभागाने वेळेवर पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने संतप्त शेतकरी कार्यालयात जमले. अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त शेतकऱ्यांनी काही काळ अधिकाऱ्यांना कोंडून धरले होते.

पाटबंधारे विभागाचे अभियंता शशांक शिंदे तातडीने कुरुंदवाड येथे दाखल झाले. त्यांनी त्वरित रुई व सुर्वे बंधाऱ्यातून जादा पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. २३ एप्रिलपर्यंत तेरवाड बंधाऱ्यात किमान ३० फूट पाण्याची पातळी राहील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. शिरढोणचे सरपंच भास्कर कुंभार, दस्तगीर बाणदार, अरुण शिंगे, डॉ. संदीप नागणे, शाहीर बाणदार, अर्जुन बेबडे, अस्लम मुजावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.