शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांना मिळणार

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांना मिळावा यासाठीचा पुणे येथील शेतकरी बझारच्या धर्तीवर करवीरनगरीतील पहिला शेतकरी बझार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात सुरु करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील १० मध्यवर्ती ठिकाणी शेतकरी बझार सुरु करण्यात येणार आहेत. राज्य पणन मंडळ व आत्मा यांच्या सहकार्याने या उपक्रमाला हात घातला जात असून जिल्हा प्रशासन, महापालिका, स्थानिक तालिम मंडळे, नगरसेवक, नागरिक यांना सामावून घेवून शेतकरी बझारला प्रारंभ केला जात आहे. शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळण्यास मदत करणारा आणि ग्राहकांच्या झोळीत किफायतशीर भावात शेती उत्पादने मिळवून देणाऱ्या या अनोख्या प्रयोगाविषयी करवीरकरांमध्ये उत्स्कुता ताणली आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना अडतमुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट उत्पादकाला विकता यावे यासाठीही राज्य शासन पावले उचलत आहे. वरकरणी हा उपक्रम सोपा वाटत असला तरी त्याचा मार्गही बिकट आहे. शेतकऱ्यामध्ये शेतीमाल विक्री करण्याची मानसिकता निर्माण करणे, त्याने विक्री कौशल्य आत्मसात करणे, नागरीभागात विक्रीसाठीच्या जागेपासून ते अन्य सुविधा उपलब्ध होणे अशा अनेक प्रकारच्या कसरती कराव्या लागणार आहेत.

शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना माल विक्री करण्याचा प्रयोग पणन मंडळाच्या सहकार्याने पुणे येथे चांगलाच यशस्वी झाला आहे. सध्या तेथे आठवडयातून एकदा भरणारे एकूण २८ शेतकरी बझार सुरु आहेत. याच धर्तीवर कोल्हापूर शहरात तसेच जिल्हयातील नगरपालिका, तालुक्याची ठिकाणे, गर्दीच्या जागा येथे शेतकऱ्यांना थेट विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याकरिता प्रथम शेतकरी प्रवृत्त होणे गरजेचे असल्याने बुधवारी येथील आत्माच्या कार्यालयात शेतकरी कंपन्या व  शेतकरी गट यांची एक बठक पार पडली.

या वेळी पणन विभागाचे व्यवस्थापक संपत गुंजाळ, सहायक सर व्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, आत्माचे संचालक तथा जिल्हा शेती अधिकारी बसवराज मास्तोळी, प्रकल्प संचालक भाग्यश्री पवार यांनी शेतकऱ्यांना प्रबोधित केले. या उपक्रमाचे फायदे समजावून देवून शहरात शेतकरी बझार सुरु करायचा असल्याने त्यासाठी उत्पादित केलेला माल सप्टेंबर महिन्यात बाजारात आणावा यादृष्टीने मानसिक तयारी करण्यात आली. आत्मा अंतर्गत असणाऱ्या १४ शेतकरी कंपन्या असून एका कंपनीत सरासरी २५० सभासद शेतकरी आहेत.

ही कंपनी शक्य तो एकाच प्रकारची शेती उत्पादन घेत असते. खेरीज ४४० शेतकरी गट संलग्न असून त्यांचे शेकडो शेतकरी या उपक्रमाशी जोडले जात आहेत.

शेतकरी बझार शहरात १० ठिकाणी सुरु करण्याचे नियोजन असून प्राथमिक सर्वेक्षणाचे काम करण्यात आले आहे. तसेच यासाठी महापालिकेकडे संपर्क साधला जात आहे. शेतकरी बझारात शेतकरी उत्पादित माल निवडून विक्रीसाठी आणणार आहे. दलालांकडे कवडीमोलाने विकल्या जाणाऱ्या दरापेक्षा या ठिकाणी शेतकऱ्याला तो ठरवेल त्याप्रमाणे वाजवी दर मिळणार आहे.

तर याचवेळी ग्राहकांना स्वच्छ वातावरणात बाजार भावापेक्षा कमी दरात ताजा भाजीपाला, फळे उपलब्ध होणार आहेत. शेतकरी व ग्राहक यांचा दुहेरी फायद्याचा समन्वय शेतकरी बझारमधून साधला जाणार आहे.

 

Story img Loader