कोल्हापूर : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी मंगळवारी राधानगरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. भर पावसात निघालेल्या मोर्चावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
बिद्री साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई केली असून इथेनॉल प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हि कारवाई करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिल्या होत्या, असा आंदोलकांचा आरोप आहे. राजकीय आकसातून झालेल्या या कारवाईच्या निषेधार्थ बिद्रीच्या सभासदांनी पावसाची संततधार सुरु असताना जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांचा निषेध नोंदवण्यात आला.
हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम भागात मुसळधार; पूर्वेकडे उसंत
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पुढील हंगाम सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे. शेतकरी, कामगार उध्वस्त होणार आहेत. सर्वांनी संघटित होउन लढा देणे गरजेचे आहे. कारवाईबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के.पी. पाटील यांनी नमूद केले.
मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील, अजित पोवार,तानाजी खोत, शिवाजीराव परुळेकर, शरद पाडळकर,शिवसेनेचे नेते सुरेश चौगुले,संजय कांबळे,बिद्रीचे संचालक, शेतकरी उपस्थित होते.