कोल्हापूर : कागल तालुक्या पाठोपाठ आता शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनीही इचलकरंजीच्या दूधगंगा सुळकुड नळ पाणी योजने विरोधात दंड थोपटले आहेत. इचलकरंजीला पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आजी – माजी खासदार व नेत्यांचा दत्तवाड येथे बुधवारी झालेल्या बैठकीत निषेध करण्यात आला.

इचलकरंजी महापालिकेला पंचगंगा, वारणा, कृष्णा असे भक्कम पर्याय उपलब्ध असताना दूधगंगेतून पाणी नेण्याचा अट्टाहास का केला जात आहे, असा सवाल करून गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले म्हणाले, मुळातच काळम्मावाडी धरणात पाणी शिल्लक राहत नसल्याने इचलकरंजीला पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. पाण्यावर कोणाला हक्क सांगता येत नाही, तसेच इतरांच्या हक्काचे पाणीही कोणाला हिरावून घेता येणार नाही. सुळकुड नंतर पुढे असणारे शिरोळ तालुक्यात शेतीचे क्षेत्र इचलकरंजीकर ३०० हेक्टर असल्याचे सांगतात प्रत्यक्षात ते १० हजार एकर आहे. शिवाय कर्नाटक मध्ये ३० हजार एकर शेती क्षेत्र आहे. दूधगंगा नदीतच पाणी उरणार नसेल तर शिरोळ तालुक्यातील पाच गावांना कालव्याद्वारे भागात पाणी कुठून देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजगोंड पाटील म्हणाले, काळम्मावाडी धरणात अतिरिक्त साठा आहे असे इचलकरंजीकरांचे म्हणणे असेल तर मग दूधगंगा नदी काठावरील शेकडे शेती वाळली कशी? यंदा शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. जून महिन्यात दत्तवाड गावात पाण्यासाठी नदीपात्रात कुपनलिका खुदाई करण्याची वेळ आली होती. इचलकरंजीला पाणी दिले तर ही परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशारा त्यांनी दिला.